शेतकऱ्यांनी उसाची एकरी उत्पादकता वाढवावी – मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

हुमणी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कॉम्बो ट्रॅप प्रभावी ठरेल – मा.कृषीमंत्री बाळासाहेब थोरात
ऊस व दूध हे शाश्वत उत्पादन देणारे : विषमुक्त अन्न महत्त्वाचे
थोरात सहकारी साखर कारखाना येथे हुमणी कीड नियंत्रण साठी कॉम्बो ट्रॅप प्रशिक्षण
मागासवर्गीय शेतकऱ्यांना कॉम्बो ट्रॅप चे वितरण

Sangmner vijay kapse दि २७ मार्च २०२६– राज्यामध्ये अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. सर्वत्र जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. अशा काळात आपल्या कारखान्याने कायम चांगला भाव दिला आहे. कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडी बरोबर एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. एकरी उत्पादन वाढीमध्ये हुमणी अळीसारखे अनेक अडचणी आहेत. हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॉम्बो ट्रॅप चा वापर प्रभावी ठरेल असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून विषमुक्त शेती गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भारतीय कृषी संशोधन परिषद व ऊस संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हुमणी आळी नियंत्रणासाठी कॉम्बो ट्रॅप चा वापर याबाबतचे एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लखनऊ येथील भारतीय उत्सव संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर बोरसे, शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात, चेअरमन पांडुरंग पा.घुले, संचालक रामनाथ कुटे, विजय राहणे, विनोद हासे, विलास शिंदे, अरुण वाकचौरे, नवनाथ आरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, भास्कर बागुल, माणिकराव यादव, किरण रोहम, सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे, प्रा.जी.बी.बाचकर यांच्यासह विविध अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय ऊस संशोधन संस्थेच्या वतीने तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना कॉम्बो ट्रॅपच्या किटचे वितरण करण्यात आले. याचबरोबर मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दोन्ही संस्थांच्या संयुक्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली आहे. विविध विद्यापीठ मधून होणारे संशोधन या संस्थेमध्ये जातात. त्या माध्यमातून नवनवीन संशोधन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होते. ऊस व दूध हे शाश्वत उत्पादन देणारे आहे. थोरात कारखाना व दूध संघाने कायम चांगला भाव दिला आहे. निळवंडेच्या पाण्यामुळे ऊस क्षेत्र वाढणार आहे. शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढवले पाहिजे. याकरता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. या ऊस उत्पादकता वाढीमध्ये हुमणी आळी यासारखे मोठे अडथळे आहेत. विविध फवारणीमुळे मित्र कीड मारली जाते. मात्र हुमणी आळी जमिनीखाली राहते. म्हणून कॉम्बो ट्रॅप मुळे हुमणी आळी यंत्रणात येण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
विविध कीटकनाशकांमुळे मित्र कीड मारली जात असल्याने त्यावर जगणारे पक्षी कमी झाले आहेत. अनेक शहरांमध्ये ग्रामीण भागापेक्षा जास्त पक्षी आहेत. यापुढील काळात विषमुक्त अन्नासाठी विषमुक्त शेती गरजेची असल्याचे ते म्हणाले.
तर डॉ.योगेश थोरात म्हणाले की, हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा ऊस,नारळ, डाळिंब या पिकांवरही होत आहे. मुरबाड जमीन, शेतीलगत बोर,निंब,बाभळ अशी झाडे असणे यामुळे ही अळी वाढते.या अळीचे एकत्रितपणे नियंत्रण केले पाहिजे. उन्हाळ्यामध्ये या अळीचे भुंगेरे बाहेर येतात. कॉम्बो ट्रॅप मुळे या भुंगेऱ्यांना रात्री एकत्र गोळा करता येणार आहे. या सर्व भुंगेऱ्यांना नंतर जमिनीत काढून टाकून त्याचे खत सुद्धा होऊ शकते. जमिनीची नांगरट दिवसा केली तर अनेक पक्षी येऊन जमिनीतील कीटक खातात. मात्र सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीची रात्रीची नांगरट करतात. त्यामुळे पक्षी रात्री कीटक खाण्यासाठी येत नाहीत. आणि त्यातून हे हुमणी अळीचे कीटक वाढत जातात. कॉम्बो ट्रॅप च्या वापरा बरोबरच अधिक हुमणी अळी झाल्यास जैविक कीडनाशकांचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. याचबरोबर कॉम्बो ट्रॅप द्वारे हुमणी अळी पकडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ ज्ञानेश्वर बोरसे यांनी केले. तर व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.




