प्राचार्य जयंत ताकवले यांना कोपरगांवात विद्यार्थ्यांकडून श्रध्दांजली

प्राचार्य जयंत ताकवले यांना कोपरगांवात विद्यार्थ्यांकडून श्रध्दांजली
प्राचार्य जयंत ताकवले यांना कोपरगांवात विद्यार्थ्यांकडून श्रध्दांजली

Kopargaon vijay kapse दि. २७ मार्च २०२६- कोपरगांव तालुक्यात सन १९७७ – ७८ च्या दरम्यान इंग्रजी माध्यमाचा पाया रचणारे शारदा इंग्लिश मेडीयम स्कुलचे संस्थापक प्राचार्य जयंत ताकवले सरांचे पुण्यात मंगळवारी ( दि. २४ मार्च ) रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. कोपरगांवशी जिव्हाळ्याचे नाते असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी कोपरगांव येथे अस्थी कलश आणून हिंगणी बंधाऱ्यानजीक गोदावरी नदीत अस्थींचे विधीवत विसर्जन केले. त्यानंतर कोपरगांवातील नामदेवराव परजणे पाटील सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात स्व. ताकवले सरांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

कोपरगांव शहर व तालुक्यातील सन १९७८ ते १९९५ दरम्यानच्या कालावधीत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या ताकवले सरांच्या शारदा इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांसह जीपीएस, पीपीएसच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत अस्थी कलशाला अभिवादन करुन गोदावरी नदीत अस्थींचे विसर्जन केले. स्व. ताकवले सरांचे चिरंजीव नितीन ताकवले व कन्या यामिनी यांच्या उपस्थितीत नामदेवराव परजणे पाटील सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली.

सरांच्या कोपरगांवातील शैक्षणिक कार्याला व आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. अवघ्या तीन खोल्यांमधून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करून कोपरगांवमध्ये इंग्रजीचा पाया त्यांनी रचला होता. त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध व्हावे हा दृष्टीकोन समोर ठेऊन त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. अतिशय कडक शिस्त, स्मरणशक्ती, सर्वच विषय शिकविण्याची त्यांची हातोटी या बाबींचा विद्यार्थ्यांच्या मनावर पडलेला प्रभाव आजही कायम आहे. दैनंदिन प्रातःसमयीची प्रार्थना, अथर्वशीर्ष, गीतेच्या १६ व्या अध्यायाचे पठण, मारुती स्तोत्र हे त्यांचे दैनंदिन नियम होते. शिक्षणाबरोबरच स्वच्छता आणि स्वालंबनाचे धडे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले करारी व्यक्तिमत्व म्हणून ताकवले सरांचा विद्यार्थ्यांमध्ये मोठा दरारा होता. कडक शिस्तीचे असूनही विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या मनात अतिशय मायाळूपणा होता. स्व. सरांप्रमाणेच त्यांच्या पत्नीनेही विद्यार्थ्यांना आईचे प्रेम दिले होते. स्व. ताकवले सरांसारखा जीवनाला दिशा देणारा शिक्षक पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करुन सरांच्या स्मृतींना अभिवादन केले.
याप्रसंगी स्व. ताकवले सरांचे विद्यार्थी महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, प्राचार्य ज्ञानदेव सांगळे, गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप जगताप, अनिल सोनवणे, संग्राम देशमुख, कांतीलाल गुरसळ, रोहीत वाघ, मंगेश पाटील, विजय जाधव, शारदा स्कुलच्या सौ. अमृतकर, बाळासाहेब वक्ते, विजयराव रोहोम, राजेश ठोळे, जितेंद्र गंगवाल, नितीन बागरेचा, गोपाल लोंगाणी यांच्यासह तत्कालीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





