बागेश्वर व संजय गायकवाड यांचा जोडे मारो आंदोलन करत जाहीर निषेध

बागेश्वर व संजय गायकवाड यांचा जोडे मारो आंदोलन करत जाहीर निषेध
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल तीव्र निषेध आंदोलन

Sangmner vijay kapse दि २६ एप्रिल २०२६– संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबा बागेश्वर व शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध करत संगमनेर मध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले.

संगमनेर मधील सर्व पुरोगामी संघटना व मी संगमनेरकर यांच्या वतीने बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री व शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड यांचा जोडे मारो आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गा तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात,शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अनिकेत घुले, निखिल पापडेजा,वैष्णव मुर्तडक, सुभाष सांगळे, विजय पवार, रामेश्वर पानसरे,राम अरगडे, विजय उदावंत, अशोक सातपुते, आकाश कडलग, बाबासाहेब गायकर, तात्याराम कुटे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.महाराजांचा जयघोष केल्यानंतर तथाकथित महाराज धीरेंद्र शास्त्री व शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा सर्व तरुणांनी जाहीर निषेध केला. दरिंदर शास्त्री व बेताल संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध असो अशा घोषणा दिल्या.यावेळी जोडे मारो व त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, कुणी कितीही मोठा महाराज स्वतःला म्हणून घेत असला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांइतका कोणीही मोठा होणार नाही. उत्तर भारतातून काही लोक येऊन महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शूर वीरांचा महाराष्ट्र आहे. संतांचा आणि समाजसेवकांचा वारसा या मातीला लाभला आहे.
महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करत असताना त्या व्यासपीठावर आरएसएस आणि महायुतीचे मोठे नेते उपस्थित होते. अशा वेळी त्यांनी एक शब्दही बोलू नये हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराजांच्या महाराष्ट्रात आशा वक्तव्यांना माफी नाही. असे सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी युवकांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सुभेदार असलेल्या संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे.वाचन नाही कोणतीही माहिती नाही. असे असताना महाराष्ट्रामध्ये द्वेषभावना वाढीस लावण्याचे काम ही मंडळी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम महिलांचा सन्मान केला आणि हे आमदार महोदय प्रकाशकाच्या आई आणि भगिनींबद्दल जे बोलले ते अत्यंत निंदनीय आहे. बागेश्वर सारखा स्वयंघोषित महाराज महाराष्ट्रात येऊन खोटे बोलत आहे. खोटा इतिहास आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.आंबेडकर यांचे महत्त्व कमी करण्यासाठी काही कपटी प्रवृत्ती कट कारस्थान करत आहेत. हिंदू धर्म हा समता सांगणार आहे. परंतु या लोकांना वर्णव्यवस्था अभिप्रेत असून बहुजनांना गुलामीत ठेवायचे आहे म्हणून बहुजनांनी जागृत झाले पाहिजे. बहुजनांचेच मुलं त्यांचे अनुयायी होत असल्याची खंत व्यक्त करताना या लोकांचा हेतू चांगला नाही हे बहुजनांच्या मुलांनी समजून घ्यावे असे ते म्हणाले.
यावेळी बागेश्वर व संजय गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या निषेध मोर्चासाठी संगमनेर मधील सर्व पुरोगामी संघटना,राजकीय संघटना,सेवाभावी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, दलित पॅंथर, सत्यशोधक विचार मंच, छात्र भारती विद्यार्थी सेना, महिला काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



