जलयात्रेमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ – मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

जलयात्रेमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ – मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव
‘गोदा ते नर्मदा‘ जलयात्रा महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची आपली यात्रा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
जलयात्रेतून जलसंवर्धनाचे व्यापक मंथन – जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
Shirdi vijay kapse दि. ३० एप्रिल २०२६– ‘‘पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र अद्भुत आणि उज्ज्वल होते, म्हणूनच ते आपल्यासाठी आदर्शवत आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांनी देशाला दिशा दिली असून, त्यांचे सुशासन आणि जीवनकार्य अनेक शतकांपर्यंत सर्वांना प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या आशीर्वादानेच सरकारचे काम सुरू असून, ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले आहे,” असे भावोद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी श्रीक्षेत्र चौंडी आणि गोदावरीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा पाच दिवसांच्या प्रवासानंतर काल, बुधवारी महेश्वर येथे पोहोचली.

अतिशय भारलेल्या आणि मंगलमय वातावरणात, मंत्रघोषाच्या जागरात नर्मदा घाटावर डॉ. यादव यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप झाला. यावेळी महाराष्ट्रातील १३० नद्यांमधून आणलेले पवित्र जल नर्मदेमध्ये विसर्जित करण्यात आले. त्यानंतर गोदामातेची महाआरती करून चौंडी येथील मातीचा कलश मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि अहिल्यादेवींचे सोळावे वंशज श्रीमंत युवराज यशवंतराव होळकर बहाद्दर यांच्याकडे मंत्री विखे पाटील यांच्यासह जलयात्रेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी सुपूर्द केला.

अहिल्यादेवींच्या राजवाड्यासमोर असलेल्या प्रशस्त घाटावर जलयात्रेचा समारोप सोहळा रंगला. नर्मदेच्या विशाल पात्रातून वाहणाऱ्या पाण्यावरचे हलके तरंग, आकर्षक प्रकाशयोजना, महाराष्ट्रातून आलेल्या यात्रेकरूंचा आणि वारकरी संप्रदायाचा उत्साह, छत्रपती शिवराय व अहिल्यादेवी यांच्या जयजयकाराच्या घोषणा, ‘नर्मदाष्टकम्’चा नाद आणि नर्मदेची आरती यामुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, विधान परिषदेचे सभापती प्रा.ना.राम शिंदे, मंत्री जयकुमार रावल, होळकर घराण्याचे युवराज यशवंतराव होळकर, खासदार शंकर लालवाणी व खासदार रामराव वडकुते, महेश्वरचे आमदार राजकुमार मेव, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, श्री. उद्धव महाराज मंडलिक, महेश्वर नगरपालिकेचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले की, “राज्यकर्त्याच्या नात्याने अहिल्यादेवींची भूमिका अद्भुत म्हणावी अशीच आहे. त्या आमच्यासाठी सदैव आदर्श आहेत. आमच्या सरकारला त्यांचाच आशीर्वाद आहे. परकीय आक्रमकांचा सामना करण्यास लोक घाबरत होते, त्या काळात अहिल्यामाता लढल्या. त्यांचे राज्य छोटे असेल कदाचित; पण लढण्याचा आणि लोकहितासाठीच राज्य करण्याचा त्यांचा निर्धार मोठा होता.””श्रीकृष्णाने सांगितलेला कर्मवाद पुण्यश्लोक अहिल्याबाई जगल्या. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याला आदर्श घ्यायला लावणारा आहे. भारतात पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण अशा चारही दिशांना त्यांनी नदीकिनारी घाट बांधले. असंख्य देवस्थानांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. असे प्रत्येक देवस्थान त्यांची गौरवगाथा गात आहे,” असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.
‘महाराष्ट्र – मध्यप्रदेश जुळे भाऊ’
‘‘महाराष्ट्राचे नुसते नाव घेतले तरी मी रोमांचित होतो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जणू जुळे भाऊ आहेत,’’ असे सांगून डॉ. यादव म्हणाले की, ‘‘लोकमाता अहिल्याबाईंमुळे आपले नाते होतेच, पण ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेमुळे ते अधिक दृढ झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक आणि उज्जैन हे आपले तिसरे नाते आहे. महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, शिंदे, होळकर असे अनेक महापुरुष देशाला दिले; त्या सर्वांनी देशाला नवी दिशा दिली आहे,’’ असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
जलयात्रेची माहिती देताना ना. विखे पाटील म्हणाले, ‘‘जलयात्रेच्या माध्यमातून एक लोकचळवळ तयार झाली, ही यात्रेची मोठी फलश्रुती आहे. जलव्यवस्थापन, लोककल्याण आणि सुशासनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळखल्या जातात. एक राज्यकर्त्या म्हणून त्यांनी केलेले काम आजही आमच्यासाठी मार्गदर्शक आहे.’’
‘जलयात्रेमुळे जागरूकता’
‘‘पाण्याच्या प्रत्येक थेंबागणिक अधिक उत्पादन’ यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही जलयात्रा यशस्वी झाली,” असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, ‘‘जलयात्रेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील १३० नद्यांचे पाणी एकत्र केले. त्यातून जलसंवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबद्दल मोठी जागरूकता निर्माण झाली. त्यामुळेच ही जलयात्रा केवळ धार्मिक वा आध्यात्मिक स्वरूपाची सांकेतिक यात्रा न राहता, त्यातून पर्यावरण संरक्षण आणि जलसंवर्धनावर मोठे मंथन झाले आहे. पाणी हे केवळ जीवनच नाही तर ती ऊर्जाही आहे, हा संदेश या यात्रेमुळे जनसामान्यांपर्यंत पोहोचला आहे.’’
‘चौदा कोटी जनतेची जलयात्रा’
ना. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे ऐतिहासिक आयोजन झाले, असे कौतुकोद्गार काढून महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री. विखे पाटील यांनी आम्हा सगळ्यांसमोर जलयात्रेची कल्पना मांडली, तेव्हा ती एवढी मोठी होईल असे वाटले नव्हते. तथापि, ही यात्रा अत्यंत व्यापक झाली आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची ती स्वतःची यात्रा बनली. या माध्यमातून पर्यावरण आणि जलसंधारण याबाबत मोठी जागरूकता निःसंशयपणे झाली आहे.” “संपूर्ण जग पाणीटंचाईच्या चिंतेने ग्रासले असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंस्कृती वर्धिष्णू करण्याबाबत बोलतात आणि विचार करतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव याच रांगेतील नेतृत्व आहेत. त्यांनी आखलेली ‘जलगंगा संवर्धन’ मोहीम आणि अन्य उपक्रम पाहिले, तर त्यांना मध्य प्रदेशचे ‘जलक्रांतीदूत’ म्हटले पाहिजे,” असे श्री. बावनकुळे म्हणाले. अध्यात्म, लोककल्याण आणि संस्कृती यांचा पवित्र संगम म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, “लोकमाता अहिल्यादेवींनी जलव्यवस्थापनातून लोकशाहीची पायाभरणी केली आणि प्रजेला ऊर्जा दिली. आज येथे दोन नद्यांचा महासंगम झाला आहे, पण त्याला तिसरी नदीही मिळाली आहे; ही तिसरी नदी म्हणजे खुद्द अहिल्यादेवी होत!” कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले.
सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करून आलेली ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा बुधवारी दुपारी महेश्वर येथे पोहोचली, तेव्हा स्थानिक नागरिकांनी तिचे उत्साहात स्वागत केले. यात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. तेथून प्रमुख पाहुण्यांसह यात्रा मिरवणुकीने समारोपस्थळी आली. मिरवणुकीच्या मार्गावर सादर करण्यात आलेल्या विविध लोककला आणि खेळांनी महेश्वरचे नागरिक मंत्रमुग्ध झाले.
डॉ. मोहन यादव म्हणाले, ‘‘यात्रेच्या समारोपाला मी उपस्थित राहावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मला फोन केला. ‘देवाभाई जो कहे वह हमेशा सुनेंगे।’ त्यातून यात्रेचे नेतृत्व करणारे आहेत मंत्री विखे पाटील; ज्यांच्या नावात ‘राधा’ आहे, ‘कृष्ण’ आहे आणि ते स्वतः पाटील! शिवाय यात्रा अहिल्यादेवींचे आदर्श जपणारी आहे, म्हणूनच मी मोठ्या आनंदाने येथे आलो.’’
गोदावरी नदी ही संस्कृतीची संजीवनी आहे, असे संत एकनाथ महाराज यांनी म्हटल्याचे सांगून ना. विखे पाटील म्हणाले, ‘‘वारकरी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यामुळे ही पाच दिवसांची जलयात्रा यशस्वी झाली. अहिल्यादेवींचे दैवत असलेल्या श्री शंकराला प्रिय असणाऱ्या महेश्वरमधील बेलवृक्षाला आम्ही श्रीक्षेत्र चौंडी येथील माती आणि गोदावरीचे पाणी घालून वाढवू. या जलयात्रेचा स्मृतिफलकही अहिल्यादेवींच्या राजधानीत लावू.’’
आ. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीने महेश्वरकरांची मने जिंकली. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे आणि ‘देवाभाऊ’ महाराष्ट्राचे ‘वॉटरमॅन’ आहेत.”



