शिव अमृत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात

शिव अमृत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात
शिव अमृत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात

Kopargaon vijay kapse दि १५ जुलै २०२६: शिव अमृत कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान), उक्कडगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ बुधवारी (दि. १५ जुलै) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, कोपरगावचे संचालक रेवणनाथ पाटील निकम होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोनवणे सर (प्रशासक) उपस्थित होते. तसेच अन्साराम भाऊ, बाळासाहेब निकम, राणी निकम, मारथा ताई, देविदास शिंदे, संदीप भाऊ निकम आणि कोळपकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत विज्ञान शाखेचे महत्त्व आणि करिअरच्या विविध संधींबाबत माहिती मांडली. वृषाली कदम, श्वेता घागरे आणि आदिती निकम यांनी आपले विचार व्यक्त केले. सोनवणे सर व कोळपकर सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विज्ञान शाखेत यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा दिली. अन्साराम भाऊ निकम यांनी परिसरातील विद्यार्थ्यांनी स्थानिक महाविद्यालयाचा लाभ घेऊन शिक्षणातून स्वतःचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले.

विभागप्रमुख रामेश्वर टुपके यांनी विज्ञान शाखा सोपी असून त्यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. प्राचार्य शरद भुजाडे यांनी विज्ञान शाखेचे महत्त्व, उच्च शिक्षणाच्या संधी तसेच महाविद्यालयाची आचारसंहिता याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात रेवणनाथ पाटील निकम यांनी शिक्षण हा जीवनाचा भक्कम पाया असून ते व्यक्तीला समृद्धता व सामर्थ्य प्रदान करते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना आज्ञाधारकता, शिस्त आणि समाजाभिमुख वृत्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक रामेश्वर टुपके, हृषीकेश थोट, अनिकेत काटे, अनुराधा भुजाडे, सोनवणे मॅडम आणि शुभांगी गव्हाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनी तनुजा उफाडे आणि गायत्री पवार यांनी केले.



