सोमय्या महाविद्यालयाचे संशोधक अनिरुद्ध भरत जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

सोमय्या महाविद्यालयाचे संशोधक अनिरुद्ध भरत जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर
‘अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा राजकीय प्रक्रियेवर झालेला परिणाम’ या विषयावरील संशोधनाची दखल
Kopargaon vijay kapse दि १७ जुलै २०२६ : सहकारी चळवळीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा स्थानिक राजकारणावर झालेला प्रभाव अभ्यासणाऱ्या संशोधनासाठी कोपरगाव येथील संशोधक डॉ. अनिरुद्ध भरत जाधव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे.
डॉ. जाधव यांनी “अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा राजकीय प्रक्रियेवर झालेला परिणाम” या विषयावर संशोधन पूर्ण केले. हा शोधप्रबंध के. जे. सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव येथील पदव्युत्तर राज्यशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत सादर करण्यात आला. या संशोधनासाठी राज्यशास्त्र विभागाचे मार्गदर्शक प्रो. डॉ. सुरेश मंजुळदास देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संशोधनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने, दूध संघ, पतसंस्था आणि शिक्षण संस्थांनी स्थानिक सत्तेची समीकरणे, निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय नेतृत्व घडविण्यात बजावलेली भूमिका सखोल व सांख्यिकी पद्धतीने उलगडण्यात आली आहे. सहकारातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण हा प्रवास पुराव्यांसह मांडण्यात आला असून, हा अभ्यास भविष्यातील राजकीय संशोधकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांच्या हस्ते डॉ. अनिरुद्ध जाधव आणि त्यांचे मार्गदर्शक प्रो. डॉ. सुरेश देवरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. ठाणगे यांनी डॉ. जाधव यांच्या चिकाटीचे कौतुक करत हे संशोधन जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक अभ्यासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. जाधव यांच्या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार तसेच कोपरगाव परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




