नगरपरिषदेतर्फे डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारकाचे शासकीय लोकार्पण; उपोषण स्थगित

नगरपरिषदेतर्फे डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारकाचे शासकीय लोकार्पण; उपोषण स्थगित
नगरपरिषदेतर्फे डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारकाचे शासकीय लोकार्पण; उपोषण स्थगित

Kopargaon vijay kapse दि १७ जुलै २०२६ : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या शासकीय लोकार्पणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण अखेर सकारात्मक चर्चेनंतर स्थगित करण्यात आले. नगराध्यक्ष पराग संधान यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्मारकाचे लोकार्पण कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून शासकीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

उपोषणस्थळी नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, राजेंद्र बागुल, विजय वाजे, प्रशांत कडू, आकाश वाजे, कैलास मंजुळ, फिरोज पठाण, दत्तू पगारे, सोमनाथ म्हस्के, रोहित कनगरे, शरद त्रिभुवन, उमेश धुमाळ, सतीश रानोडे, जयवंत मरसाळे, विक्रांत सोनवणे, सिद्धांत सोनवणे, रवींद्र सानप, रवींद्र शेलार, रोहिदास पाखरे, फकीरमहमद पहिलवान, इरफान कुरेशी, शंकर बिराडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देत समाजबांधवांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी नगराध्यक्ष संधान यांनी सांगितले की, नगरपरिषद यापूर्वीपासूनच समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. समाजबांधवांच्या अपेक्षेनुसार स्मारकाचे लोकार्पण शासकीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह’ हे नाव कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. नाट्यगृहाच्या जागेचा करार संपुष्टात आल्यानंतर २०२४ पासून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र मार्च २०२६ पासून या प्रक्रियेला गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी स्तरावरील पुढील कार्यवाही सुरू आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनीही हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शासन व जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावा केल्याची माहिती संधान यांनी दिली.
नगराध्यक्षांच्या सकारात्मक भूमिकेवर विश्वास व्यक्त करत समाजबांधवांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. संवाद, समन्वय आणि सकारात्मक कृतीच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न सोडविण्याची नगरपरिषदेची भूमिका कायम राहील, असेही संधान यांनी यावेळी सांगितले. बैठकीस नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपोषणकर्त्यांनी घेतला माघारचा निर्णय
पूर्णाकृती स्मारकाच्या शासकीय लोकार्पणाबाबत नगरपरिषदेने सकारात्मक भूमिका घेतल्याने अर्जुन मरसाळे, नितीन साबळे, फकीरा चंदनशिव, रवींद्र डोलारे आणि शरद त्रिभुवन यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.



