ग्लोबल स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःला घडवा : अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे

ग्लोबल स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःला घडवा : अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे
संजीवनी विद्यापीठात ‘संजीवनी संकल्प 2K26’ अंतर्गत नवागतांचे स्वागत
Kopargaon vijay kapse दि १८ जुलै २०२६ : आजच्या काळात विद्यार्थ्यांची स्पर्धा केवळ वर्गातील विद्यार्थ्यांशी नसून जगभरातील विद्यार्थ्यांशी आहे. त्यामुळे शिस्त, कौशल्य आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर स्वतःला घडवा. करिअर असे निवडा की त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळविण्याची जिद्द कायम ठेवा, असे प्रेरणादायी प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले.

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘संजीवनी संकल्प 2K26’ कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अमित कोल्हे होते.
आपल्या मार्गदर्शनात वाघचौरे म्हणाले, शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. बाबा आमटे, विराट कोहली, एम. एफ. हुसेन, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि वॉरेन बफेट यांच्या उदाहरणांचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना कोणतेही क्षेत्र निवडा, मात्र त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळविण्याची जिद्द ठेवा, असा संदेश दिला.

“मी बैलगाडीतून प्रवास करणारा विद्यार्थी होतो; आज लाल दिव्याच्या गाडीत आलो आहे. त्यामुळे स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि सातत्याने मेहनत करा, यश निश्चित मिळते,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
सायबर सुरक्षेच्या विषयावर बोलताना त्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. मोबाईल हे उपयुक्त साधन असले तरी त्याद्वारे सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी सतर्क राहून विवेकाने तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच कोणत्याही व्यसनांच्या आहारी न जाता आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करा; मात्र त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. तंत्रज्ञानावर आपले नियंत्रण असावे. पदवी तुम्हाला नोकरीसाठी पात्र बनवते, तर कौशल्य तुम्हाला रोजगारक्षम बनवते. संजीवनी विद्यापीठात इंडस्ट्री-पॉवर्ड अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप, परकीय भाषा प्रशिक्षण आणि करिअर-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक संधींसाठी तयार केले जाते. या संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकूर, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, डीन डॉ. कविथा राणी, डॉ. प्रिया आर, डॉ. विनोद मालकर, डॉ. सरिता पवार, डॉ. मकरंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी धनश्री देवकर व स्वस्तिका जगताप यांनी केले, तर आभार रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे यांनी मानले.



