अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड
सी. व्ही. रमन परीक्षा, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतही घवघवीत यश

Sangmner vijay kapse दि १८ जुलै २०२६: अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सी. व्ही. रमन परीक्षेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दोन विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली असून, जवाहर नवोदय निवड चाचणी आणि जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे.

महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या संकल्पनेतून शाळेत विज्ञानविषयक उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागाला प्रोत्साहन दिले जाते.

सी. व्ही. रमन परीक्षेत पाचवीतील अनन्या विशाल मोरे हिने ८० टक्के गुण मिळवले, तर सातवीतील विराज जयराज हिरे याने ७२ टक्के गुणांसह तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे दोघांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीत श्रावणी किशोर खेमनर हिची निवड झाली. तसेच जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वज्ञा सुभाष यादव हिने ७६.५१ टक्के गुणांसह जिल्ह्यात २१ वा, तर अन्वी सिताराम कवडे हिने ७३.१५ टक्के गुणांसह जिल्ह्यात २५ वा क्रमांक मिळवला. या यशामुळे संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
इस्रो अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध संशोधन केंद्रांना भेट देऊन अंतराळ संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवनिर्मितीची प्रेरणा विकसित होण्यास मदत होणार आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्या जे. बी. सेटी तसेच विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.




