वारकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून ६१.७६ लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर – ना. राधाकृष्ण विखे पाटील
वारकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून ६१.७६ लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर – ना. राधाकृष्ण विखे पाटील
वारकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून ६१.७६ लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर – ना. राधाकृष्ण विखे पाटील
Loni vijay kapse दि २१ जुलै २०२६: आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना’ अंतर्गत जिल्ह्यास ६१ लाख ७६ हजार रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अहिल्यानगर जिल्ह्यातून विश्वगुरू संत निवृत्तीनाथ महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री निळोबाराय महाराज तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज (नेवासा) आषाढी वारी पालखी यांच्यासह इतर अनेक पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती शौचालये, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, औषधांचा पुरवठा तसेच जलरोधक मंडप उभारणीसाठी ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.
या निधीव्यतिरिक्त आणखी निधी मंजूर करण्याची विनंती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार महायुती सरकारने ६१ लाख ७६ हजार रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे.

मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील पालख्या आणि वारकऱ्यांसाठी प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आषाढी वारीत अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालख्यांचा मान आणि परंपरा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले.



