संजीवनी युनिव्हर्सिटीच्या पुढाकारातून आषाढी वारीनिमित्त येसगावातील ४० महिला भाविकांना पंढरपूर दर्शन

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या पुढाकारातून आषाढी वारीनिमित्त येसगावातील ४० महिला भाविकांना पंढरपूर दर्शन
संजीवनी युनिव्हर्सिटीच्या पुढाकारातून आषाढी वारीनिमित्त येसगावातील ४० महिला भाविकांना पंढरपूर दर्शन

Kopargaon vijay kapse दि २२ जुलै २०२६ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त येसगाव येथील ४० महिला भाविकांना आरामबसद्वारे पंढरपूर वारीसाठी रवाना करण्यात आले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांच्या पुढाकारातून हा भक्तिमय उपक्रम आयोजित करण्यात आला.
वारीसाठी रवाना होण्यापूर्वी अमित कोल्हे व डॉ. मनाली कोल्हे यांनी महिला भाविकांचे स्वागत करून त्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या तसेच सुखरूप व मंगलमय यात्रेसाठी प्रार्थना केली.

यावेळी डॉ. मनाली कोल्हे म्हणाल्या की, येसगावला समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे जन्मगाव म्हणून येसगावची स्वतंत्र ओळख असून गावाच्या विकासाबरोबरच धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांच्या जतनासाठी त्यांनी नेहमीच योगदान दिले. त्यांच्या विचारांचा वारसा ग्रामस्थ जपत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून श्रद्धा, समता, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी महान परंपरा आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला अध्यात्मिक ऊर्जा मिळते. महिलांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे ही समाजाप्रती आपली बांधिलकी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या उपक्रमामुळे महिला भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रवाना होताना भाविकांनी अमित कोल्हे व डॉ. मनाली कोल्हे यांचे आभार मानले. विठ्ठलाच्या नामघोषात आणि भक्तिमय वातावरणात येसगावातून आरामबस पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी ग्रामस्थ, महिला भाविक आणि कोल्हे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


