संजीवनी युनिव्हर्सिटीत नवागत विद्यार्थ्यांचा ‘संजीवनी संकल्प २०२६’ प्रवेशोत्सव उत्साहात

संजीवनी युनिव्हर्सिटीत नवागत विद्यार्थ्यांचा ‘संजीवनी संकल्प २०२६’ प्रवेशोत्सव उत्साहात
उद्योगविश्वाला डिग्री नव्हे, कौशल्यसंपन्न विद्यार्थी हवेत – अजय सेवेकरी
Kopargaon vijay kapse दि २३ जुलै २०२६: उद्योगविश्वाला केवळ पदवीधारक नव्हे, तर समस्या सोडविणारे, बदल स्वीकारणारे आणि सातत्याने नवे कौशल्य आत्मसात करणारे विद्यार्थी हवे आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून कौशल्यांच्या बळावरच करिअरमध्ये यश मिळते, असे प्रतिपादन प्रॉस्पिरा इंडिया ऑटोमोटिव्ह प्रॉडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक अजय सेवेकरी यांनी केले.

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायन्स, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संजीवनी संकल्प २०२६’ या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी व युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे होते.

मार्गदर्शन करताना सेवेकरी म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा स्पर्धक नसून सहकारी आहे. एआयचा प्रभावी वापर आणि आवश्यक कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी संवादकौशल्य विकसित करावे, अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचन करावे, इंटर्नशिप गांभीर्याने पूर्ण करावी आणि प्रत्येक सत्रात नवे कौशल्य शिकण्याचा संकल्प करावा. चुका करण्यास घाबरू नका, त्यातून शिकत राहा आणि उत्कृष्टतेचा ध्यास घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात अमित कोल्हे म्हणाले की, ‘स्टुडंट फर्स्ट’ हा संजीवनीचा मूलमंत्र असून प्रत्येक विद्यार्थ्याचे यशस्वी करिअर घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. चांगला सीजीपीए महत्त्वाचा असला तरी तोच यशाचा अंतिम निकष नसतो. पदवी आणि गुण नोकरीसाठी पात्र बनवतात, मात्र कौशल्ये विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवून त्यांचे भविष्य सुरक्षित करतात. त्यामुळे जिज्ञासू वृत्ती जोपासून कौशल्यविकासावर भर द्यावा. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या विस्तृत नेटवर्कचा आणि सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकूर यांनी सांगितले की, संजीवनीमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते. तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील बदलांचा वेग लक्षात घेता विद्यार्थ्यांनी सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवत नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. यावेळी डीन डॉ. कविथा राणी, डॉ. आर. प्रिया, डॉ. सरिता पवार, डॉ. मकरंद कुलकर्णी, डॉ. विनोद मालकर, इम्रान शेख तसेच रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.



