सत्तेत असलात तरी जनतेसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; डॉ. सुजय विखे पाटील यांचा आमदार विठ्ठलराव लंघेंना सल्ला

सत्तेत असलात तरी जनतेसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; डॉ. सुजय विखे पाटील यांचा आमदार विठ्ठलराव लंघेंना सल्ला
सत्तेत असलात तरी जनतेसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; डॉ. सुजय विखे पाटील यांचा आमदार विठ्ठलराव लंघेंना सल्ला
Newasa vijay kapse दि २६ जुलै २०२६-“अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असलात तरी लोकहितासाठी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नका,” असा स्पष्ट सल्ला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना दिला. “सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी असून, लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांसाठी लढले पाहिजे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

नेवासा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष करण घुले, शासकीय अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, “अधिकारी काम करत नसतील तर आंदोलन करा. तुम्ही महायुतीचे आमदार असलात तरी जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यास घाबरू नका. तुम्ही आंदोलन केल्यास मी स्वतः तुमच्यासोबत सहभागी होईन. माझे वडील पालकमंत्री असले तरी जनहितासाठी आंदोलनात सहभागी होण्यास मी मागे हटणार नाही.”

अधिकाऱ्यांना उद्देशून त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागून त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. शासकीय कार्यालयांचे हेलपाटे नागरिकांना मारावे लागू नयेत. जनतेला वेळेत न्याय आणि सन्मानाची वागणूक मिळणे हेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नेवासा तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महसूल समाधान शिबिर अभियानामुळे अवघ्या एका महिन्यात पाच हजारांहून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती देत, शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पदापेक्षा जनसेवा महत्त्वाची असल्याचे सांगितले. “गरिबांचे प्रश्न सोडविणे हेच सर्वात मोठे कार्य असून, समाजसेवा करणाऱ्यालाच जनता कायम साथ देते,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तालुक्यातील ११ मंडळांमध्ये झालेल्या २२ महसूल शिबिरांतून सुमारे ७,५०० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिली. डिजिटल सातबारा, वारस नोंद, फेरफार यांसह महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणासाठी तालुक्यात २,०३५ बचत गटांमध्ये २५,५०० महिला कार्यरत असल्याची माहिती देत, अधिकाधिक महिला बचत गट स्थापन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
नेवासा शहरातील प्रलंबित अतिक्रमण प्रश्न, सिंचन, पाणी नियोजन आणि आरोग्य सुविधा याबाबतही लवकरच ठोस निर्णय घेतले जातील. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुविधा वाढविणे, गंभीर रुग्णांसाठी सक्षम रेफरल व्यवस्था उभारणे आणि वैद्यकीय अधिकारी स्थानिक पातळीवर वास्तव्यास राहतील यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत, महायुती सरकारच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील प्रलंबित विकासकामांसाठी आवश्यक निधी आणि पूर्ण पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच नेवासा शहर विकास, अतिक्रमण नियमितीकरण आणि गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी लवकरच व्यापक बैठक घेऊन ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




