आपला जिल्हा

सावळी विहीर खुर्दच्या विकासकामांचा डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून सखोल आढावा

सावळी विहीर खुर्दच्या विकासकामांचा डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून सखोल आढावा

पशुवैद्यकीय महाविद्यालय, आयटीआय इमारत, एमआयडीसी व पंपिंग स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी; गुणवत्तेशी तडजोड होणार नाही, अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

जाहिरात

Shirdi vijay kapse दि २७  जुलै २०२६सावळी विहीर खुर्द येथे सुरू असलेल्या शैक्षणिक, औद्योगिक आणि पायाभूत विकासकामांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयासह एमआयडीसी परिसरातील रस्ते, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा, पंपिंग स्टेशन, बांधकामाधीन आयटीआय महाविद्यालय आणि इतर मूलभूत सुविधांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला.

जाहिरात

यावेळी संबंधित अधिकारी, अभियंते, ठेकेदार, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत विकास कामांबाबत  सविस्तर चर्चा करताना कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा डॉ. विखे पाटील यांनी दिला.
सर्वप्रथम त्यांनी सावळी विहीर खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या राज्यातील महत्त्वाकांक्षी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची पाहणी केली. पशुवैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून पशुसंवर्धन क्षेत्रालाही नवी दिशा मिळणार आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत, विविध शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा आणि पूरक बांधकामांची प्रगती त्यांनी प्रत्यक्ष तपासली.

जाहिरात

बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जेदार साहित्याचा वापर व्हावा, सर्व कामे तांत्रिक निकषांनुसार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणीदरम्यान आवश्यक सुधारणा सुचवत त्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भविष्यात हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी निगडित असलेल्या या प्रकल्पात प्रत्येक बाब उच्च दर्जाची असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर त्यांनी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या आयटीआय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची पाहणी केली. औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आधुनिक तांत्रिक शिक्षण आवश्यक असून, या महाविद्यालयामुळे परिसरातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर डॉ. विखे पाटील यांनी एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनची पाहणी केली. उद्योगांना सातत्यपूर्ण व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध राहण्यासाठी पंपिंग स्टेशनची कार्यक्षमता, यंत्रसामग्रीची स्थिती, भविष्यातील पाण्याची गरज आणि देखभाल व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. उद्योगांना कोणत्याही परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर ग्रामस्थ आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत एमआयडीसी परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली. अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, सांडपाणी निचरा, स्वच्छता, अतिक्रमण, वीज व पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या आणि गटार व्यवस्थेतील त्रुटी निदर्शनास आल्या. ग्रामस्थांनीही विविध अडचणी मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते, ठेकेदार, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे