आपला जिल्हा

गाव तेथे उद्योजक’ अभियानातून ग्रामीण भागात उद्योगक्रांती घडवू; शिर्डीत आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याची घोषणा

‘गाव तेथे उद्योजक’ अभियानातून ग्रामीण भागात उद्योगक्रांती घडवू; शिर्डीत आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याची घोषणा

गाव तेथे उद्योजक’ अभियानातून ग्रामीण भागात उद्योगक्रांती घडवू; शिर्डीत आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याची घोषणा

Kopargaon vijay kapse दि २७ जुलै २०२६: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गाव तेथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी अभियानातून ग्रामीण भागात नवउद्योजक घडविण्याची व्यापक चळवळ उभी करण्यात येणार असून, या उपक्रमातून ग्रामीण युवकांना उद्योग, रोजगार आणि स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी व्यक्त केला.

जाहिरात

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेक इन कोपरगाव’ व ‘गाव तेथे उद्योजक’ या उपक्रमाचा शुभारंभ तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ ओमकारा बिल्स हॉटेल येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक ओमप्रकाश (काका) कोयटे होते.

जाहिरात

रवींद्र मानगावे म्हणाले की, छोट्या स्वरूपात सुरू झालेला उद्योग भविष्यात महासागरासारखा विशाल होऊ शकतो. ग्रामीण भागातील होतकरू युवकांना उद्योगाची प्रेरणा देण्यासाठी ‘गाव तेथे उद्योजक’ अभियान महत्त्वाची भूमिका बजावेल. बदलत्या काळात व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्य आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

काका कोयटे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, समता नागरी सहकारी पतसंस्थेमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक बळ मिळाले असून गेल्या पाच दशकांपासून त्यांनी व्यापारी वर्गासाठी केलेले योगदान उल्लेखनीय आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी काका कोयटे यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

जाहिरात

मानगावे यांनी पुढे सांगितले की, ‘मेक इन कोपरगाव’ आणि ‘गाव तेथे उद्योजक’ हे उपक्रम संपूर्ण देशभर राबविले गेले पाहिजेत. हरित क्रांती, धवल क्रांती आणि शिक्षण क्रांतीनंतर आता व्यापारी क्रांती घडविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शिर्डी येथे लवकरच आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून व्यापारी क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात काका कोयटे म्हणाले की, व्यापारी महासंघाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘मेक इन कोपरगाव’मधून अनेक नवउद्योजक घडले असून आता ‘गाव तेथे उद्योजक’ हा उपक्रम ग्रामीण भागातील प्रत्येक युवकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच २०१६ पासून ‘मेक इन कोपरगाव’ उपक्रमातून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘मेक इन कोपरगाव’च्या लोगोचेही अनावरण करण्यात आले.

स्वागतपर भाषण किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी केले, तर प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले. त्यांनी ऑनलाइन खरेदीमुळे किरकोळ विक्रेते व ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत ‘वन नेशन, वन वेट, वन रेट’ ही संकल्पना राबविण्याची मागणी केली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर यांनी या संकल्पनेचे स्वागत करत संबंधित केंद्रीय मंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याचवेळी त्यांनी सुधीर डागा यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या रिटेलर विंगच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली.

शिर्डी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याबाबत माहिती देताना पेडणेकर म्हणाले की, या मेळाव्यात ५०० ते ७०० लघु व मोठ्या मशिनरींचे प्रात्यक्षिक, उत्पादन, पॅकेजिंग आणि मार्केटिंग विषयावरील प्रशिक्षण तसेच जगातील १० ते १२ देशांतील व्यापारी व उद्योजकांचा सहभाग असेल. भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, निर्यातीच्या नव्या संधी निर्माण करणे आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.

जाहिरात

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते ९ जानेवारी २०२७ या कालावधीत शिर्डी येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यास देशभरातील २५ ते ३० हजार व्यापारी व उद्योजक उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष कैलास अग्रवाल, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह विविध जिल्ह्यांतील व्यापारी महासंघांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारात प्रामाणिकपणा, ग्राहकांचा विश्वास आणि आधुनिक दृष्टिकोन हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे मान्यवरांनी यावेळी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे यांनी केले, तर सुमित भट्टड यांनी आभार मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे