प्रवरा डावा-उजवा कालवा दुरुस्ती,आधुनिकीकरणामुळे सिंचन व्यवस्था सक्षम होणार

प्रवरा डावा-उजवा कालवा दुरुस्ती,आधुनिकीकरणामुळे सिंचन व्यवस्था सक्षम होणार
शेतकऱ्यांच्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Shirdi vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६– भंडारदरा प्रकल्पा वरील प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाच्या कामामुळे पाणी गळती कमी होऊन कालव्यांची पाणीवहन क्षमता वाढणार असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत वेगाने पाणी पोहोचविण्यास मदत होईल,असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वी येथे केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे प्रवरा डावा – उजव्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिकचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बाळासाहेब शेटे, अहिल्यानगरचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, तसेच जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी, लाभक्षेत्रातील लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या प्रवरा डावा कालव्याची लांबी ७६.८ किलोमीटर, तर प्रवरा उजवा कालव्याची लांबी ४४.८ किलोमीटर आहे. या दोन्ही कालव्यांद्वारे संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळतो. सुमारे २३ हजार ७७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत असून, अनेक शहरांना पिण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठीही या कालव्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

“या कालव्यांना शंभर ते १२० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने कालव्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. त्यामुळे पाण्याची गळती वाढून पाणीवहनाची कार्यक्षमता कमी झाली होती. त्याचा परिणाम सिंचन व्यवस्थेवर होत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रवरा डावा व उजवा कालव्याच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार , जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
या कामांत कालव्याचे मातीकाम, अस्तरीकरण, जलसेतू, अतिवाहक, रस्ते पूल, पादचारी पूल, मुख्य विमोचक आदी विविध बांधकामांची दुरुस्ती व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.या कामामुळे पाण्याची गळती कमी होऊन कालव्यांची कार्यक्षमता वाढेल. शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत कार्यक्षमतेने पाणी पोहोचल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध होईल. पाणी वितरण व्यवस्था अधिक सुलभ होण्याबरोबरच भविष्यातील देखभाल व दुरुस्तीचा खर्चही कमी होण्यास मदत होईल,” असे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रवरा कालव्यांच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणामुळे सिंचन व्यवस्थेला अधिक बळकटी मिळून लाभक्षेत्रातील शेतीच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना नियमित, कार्यक्षम व वेळेवर सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे हा या कामांचा प्रमुख उद्देश असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.




