हर घर तिरंगा’तून सामाजिक एकोपा; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने राहाता दुमदुमले

‘हर घर तिरंगा’तून सामाजिक एकोपा; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने राहाता दुमदुमले
हर घर तिरंगा’तून सामाजिक एकोपा; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने राहाता दुमदुमले
Rahata vijay kapse दि १५ ऑगस्ट २०२६: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राहाता नगरपरिषद, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या भव्य तिरंगा रॅलीला राहाता शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. यानंतर डॉ. विखे पाटील यांनी स्वतः तिरंगा हातात घेत शालेय विद्यार्थ्यांसमवेत रॅलीत सहभाग घेतला.

राहाता शहरातील विविध भागातून निघालेल्या या रॅलीत शालेय विद्यार्थी, युवक, महिला तसेच सर्व जाती-धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा आणि देशभक्तीच्या घोषणांनी शहरातील वातावरण भारावून गेले होते. स्वातंत्र्यदिन हा कोणत्याही एका जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा सण नसून प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन साजरा करण्याचा राष्ट्रीय उत्सव आहे, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत रॅलीत सहभागी होत त्यांचा उत्साह वाढविला. नव्या पिढीमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
‘हर घर तिरंगा’ अभियान केवळ घराघरावर राष्ट्रध्वज फडकविण्यापुरते मर्यादित न राहता तिरंग्याचा सन्मान आणि त्यासंदर्भातील नियम व प्रोटोकॉल प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. झेंडा लावल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे, सायंकाळी सन्मानपूर्वक उतरविणे आणि त्याची योग्य प्रकारे जपणूक करणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.



