नाशिक–पुणे सरळ रेल्वेसाठी ९ ऑगस्टला क्रांतीदिनी महामार्गावर चक्काजाम; नागरिकांना सहभागी होण्याचे आ. सत्यजित तांबे यांचे आवाहन

नाशिक–पुणे सरळ रेल्वेसाठी ९ ऑगस्टला क्रांतीदिनी महामार्गावर चक्काजाम; नागरिकांना सहभागी होण्याचे आ. सत्यजित तांबे यांचे आवाहन
नाशिक–पुणे सरळ रेल्वेसाठी ९ ऑगस्टला क्रांतीदिनी महामार्गावर चक्काजाम; नागरिकांना सहभागी होण्याचे आ. सत्यजित तांबे यांचे आवाहन
Sangmner vijay kapse दि ४ ऑगस्ट २०२६– नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून जनतेचे आंदोलन असल्याने भावी पिढ्यांच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
आमदार तांबे म्हणाले की, रेल्वेसारखे मोठे विकास प्रकल्प शंभर वर्षांतून एकदाच साकार होतात. आज हा प्रकल्प या भागातून गेला तर भविष्यात पुन्हा अशी संधी मिळेल, याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग आपल्या भागातूनच मार्गी लागला पाहिजे.
त्यांनी सांगितले की, या रेल्वेमार्गासाठीचा संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. एका बाजूला केंद्र सरकारकडून प्रकल्पाबाबत नकारात्मक संकेत दिले जात असले तरी जनतेच्या अपेक्षा कायम आहेत. सरकारने जनभावनेचा आदर करून या प्रकल्पासाठी व्यवहार्य मार्ग काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या पुणे–नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून दोन ते अडीच तासांचा प्रवास करण्यासाठी सहा तासांहून अधिक वेळ लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर सरळ रेल्वेमार्ग हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे तांबे यांनी नमूद केले.

सरळ रेल्वेमार्ग झाल्यास सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, जुन्नर, मंचर, चाकण यांसह पुणे आणि नाशिक या शहरांनाही मोठा दिलासा मिळेल. शिक्षण, नोकरी, उद्योग-व्यवसायासाठी दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे आंदोलन भावी पिढ्यांसाठी
“हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा एका नेत्याचे नाही. सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन भावी पिढ्यांच्या विकासासाठी उभारलेले हे जनआंदोलन आहे. जनता एकत्र आली तर सरकारला निर्णय घ्यावाच लागतो. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जिथे शक्य असेल तिथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी व्हावे.” — आ. सत्यजित तांबे

