प्रवरानगर येथे २२ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’
प्रवरानगर येथे २२ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभांचे वितरण
Shirdi vijay kapse दि २० जुलै २०२६ : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण होणार असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागामार्फत २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका दिवशी विशेष शिबिर आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांना या शिबिरातून विविध शासकीय योजनांचे लाभ, प्रमाणपत्रे व आवश्यक साहित्य वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, कौशल्य विकास, महिला बचत गट आदी विभागांच्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे व अन्य लाभांचे वितरण करण्यात येणार असून, शिबिरासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




