आपला जिल्हा

धार्मिकतेचे राजकारण नको, आता विकासाचे राजकारण हवे – विवेकानंद पाटील

धार्मिकतेचे राजकारण नको, आता विकासाचे राजकारण हवे – विवेकानंद पाटील

 संगमनेरमध्ये युवकांशी साधला संवाद; मोबाईलपेक्षा वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचण्याचे आवाहन

Sangmner vijay kapse दि १२ नोव्हेंबर २०२६ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर काम करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा आदर करणे आवश्यक आहे. चांगले राजकारण घडवायचे असेल तर चांगल्या विचारांची माणसे राजकारणात आली पाहिजेत आणि जनतेनेही योग्य प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. आता जनतेला धार्मिकतेचे नव्हे, तर विकासाचे राजकारण हवे आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याची उभारणी केली असून, युवकांनी हा विकासाचा वारसा समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील एमपीएससी आंदोलनातील नेतृत्व करणारे विवेकानंद पाटील यांनी केले.

जाहिरात

सुदर्शन निवासस्थानी आयोजित युवक संवाद कार्यक्रमात विवेकानंद पाटील यांनी संगमनेरमधील तरुणांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील युवक व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विवेकानंद पाटील म्हणाले की, आपण कोणत्याही पक्षाचे नसून महात्मा गांधी यांच्या विचारांवर काम करत आहोत. राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे. केवळ राजकारण्यांना नावे ठेवून चालणार नाही, तर चुकीचे वागणाऱ्यांना बाजूला करण्याची भूमिका जनतेने घेतली पाहिजे. युवकांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत. समतेचा विचार स्वीकारून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.

जाहिरात

नेत्यांचे अंधभक्त बनल्यास त्या नेत्याचे आयुष्यही अल्पजीवी ठरते. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी परिस्थिती पाहा, सुज्ञपणे प्रश्न विचारा आणि सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपा, असे आवाहन त्यांनी केले. समाजाला केवळ बरे ऐकण्याची सवय लागली असून, सत्य ऐकण्याची तयारी कमी होत चालली आहे. जनता सुज्ञ असेल तर सुज्ञ प्रतिनिधी निवडून येतात; मात्र चुकीच्या प्रवृत्ती वाढल्या तर चुकीचे प्रतिनिधी निवडून जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्याचे राजकारण शहाण्या लोकांच्या नव्हे, तर अति शहाण्या लोकांच्या हातात गेले असल्याची टीका करत काही विशिष्ट पक्षांचे आयटी सेल ४५ पैशांच्या दराने टीका करण्याचे काम करतात, असे ते म्हणाले. अशा टीकेकडे लक्ष न देता युवकांनी आपले काम प्रामाणिकपणे सुरू ठेवावे. टीका करणारे टीका करतील; तुम्ही काम करत राहा, एक दिवस तुमचा येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

काँग्रेस पक्षाने ७० वर्षांत देश उभा केला, तर मागील १२ वर्षांत काय केले, असा सवाल उपस्थित करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ४० वर्षांच्या कार्यकाळात संगमनेर तालुका राज्यासाठी दिशादर्शक बनविला आहे. आता पुढील लोकांनी दोन वर्षांत काय केले, असा प्रश्न युवकांनी विचारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. नव्या पिढीला धार्मिकतेचे राजकारण नको, तर विकासाचे राजकारण हवे आहे, असेही विवेकानंद पाटील यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांनी लोकशाहीच्या सद्यस्थितीवर व्यक्त केली चिंता

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पुणे येथील एमपीएससी आंदोलनाला विवेकानंद पाटील यांनी धार दिली. विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी अत्यंत परखडपणे मांडून सरकारला विचार करायला भाग पाडले. सध्या लोकशाही संकटात आली आहे. हरियाणामध्ये ७५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, मात्र त्याबाबत जनतेमध्ये अपेक्षित संवेदनशीलता दिसत नाही. कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या बाबतीतही अत्यंत चुकीच्या घटना घडल्या आहेत.

आज लोकशाही धोक्यात आली असून, झेन झी अर्थात नव्या पिढीला धार्मिकतेचे राजकारण मान्य नाही. धार्मिकतेच्या नावावर राजकारण केले जात आहे. २०१४ नंतरचा कालखंड इतिहासातील काळा कालखंड म्हणून गणला जाईल. या काळात राहुल गांधी एकटे लढत असून इतिहास त्यांच्या संघर्षाची नोंद घेईल, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.

समता आणि मानवतेचा विचार पुढे नेणार – डॉ. जयश्री थोरात

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व संत आणि समाजसुधारकांचा समता व मानवतेचा विचार घेऊन संगमनेर तालुक्यात आपण काम करत आहोत. हा विचार जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यामध्ये अनेक अडचणी येतील; मात्र अडचणींच्या काळात खंबीरपणे उभे राहून समतेचा विचार पुढे नेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी तालुक्यातील विविध युवकांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विवेकानंद पाटील यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निखिल पापडेजा यांनी केले.

 मोबाईलपेक्षा वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचा

सध्याची तरुणाई सोशल मीडियामध्ये अधिक गुंतलेली असून, काय खरे आणि काय खोटे याचा विचार न करता अनेक गोष्टी पुढे पाठवल्या जात आहेत. विशेषतः धार्मिक विषयांवरील संदेशांची सत्यता न तपासता ते प्रसारित करणे चुकीचे आहे. मोबाईलवरील माहितीमुळे वैचारिक समृद्धी निर्माण होत नाही. स्वतःचे वैचारिक स्थान बळकट करायचे असेल, तर युवकांनी दररोज वर्तमानपत्रे, त्यातील अग्रलेख, विविध घडामोडी आणि पुस्तके वाचली पाहिजेत. वाचनातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, असा मोलाचा सल्ला विवेकानंद पाटील यांनी युवकांना दिला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे