रब्बी हंगाम आणि पशुधन वाचविण्यासाठी निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा! निळवंडे पाटपाणी कृती समितीची मागणी; २० नोव्हेंबरपर्यंत पाणी न सोडल्यास मोर्चाचा इशारा

रब्बी हंगाम आणि पशुधन वाचविण्यासाठी निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा! निळवंडे पाटपाणी कृती समितीची मागणी; २० नोव्हेंबरपर्यंत पाणी न सोडल्यास मोर्चाचा इशारा
रब्बी हंगाम आणि पशुधन वाचविण्यासाठी निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा! निळवंडे पाटपाणी कृती समितीची मागणी; २० नोव्हेंबरपर्यंत पाणी न सोडल्यास मोर्चाचा इशारा
Kopargaon vijay kapse दि १२ नोव्हेंबर २०२६ : निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडू लागल्याने रब्बी हंगामातील पिकांची उभारणी धोक्यात आली असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुधनाचे हित लक्षात घेऊन निळवंडे धरणातून दि. २० नोव्हेंबर २०२६ च्या दरम्यान तातडीने पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी जोरदार मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळाले होते. मात्र, त्या पाण्याला आता जवळपास चार महिने उलटले आहेत. त्यानंतर परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने विहिरी, कूपनलिका तसेच अन्य जलस्रोतांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर रब्बी पिकांची पेरणी आणि पिके जगविण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.

रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या पिकांच्या पेरणीचा आणि वाढीचा निर्णायक कालावधी सुरू असून पाणी मिळण्यास आणखी विलंब झाल्यास शेतकऱ्यांच्या हातातून संपूर्ण हंगाम जाण्याची भीती आहे. दुसरीकडे जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पशुधन जगविण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याअभावी चारा उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना शेती आणि पशुधन अशा दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.

या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता निळवंडे धरणातून पुढील आवर्तन दि. २० नोव्हेंबर २०२६ च्या दरम्यान सोडण्याचे नियोजन करावे, अशी ठाम मागणी समितीने केली आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाल्यास रब्बी पिकांना संजीवनी मिळण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चारा उपलब्धतेचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. अन्यथा रब्बी हंगाम हातातून जाण्यासह पशुधनाचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका! पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन आवर्तन सोडण्याचे नियोजन करावे. अन्यथा लाभक्षेत्रातील संतप्त शेतकरी कोणत्याही क्षणी संबंधित कार्यालयावर मोर्चा घेऊन येतील, असा स्पष्ट इशाराही निळवंडे पाटपाणी कृती समितीने दिला आहे.
या निवेदनावर प्रभाकर आनंदा गायकवाड, प्रल्हाद लहानु गागरे, रंगनाथ धोंडीबा लोंढे, केशव सदाशिव मुसमाडे, मच्छिंद्र काळे, एम. डी. घोरपडे, विलास रंगनाथ गुळवे, अण्णासाहेब बजाबा वाघे, विजय रामचंद्र मगर आणि संतोष त्रिंबक राऊत यांची नावे आहेत. समितीचे अध्यक्ष नानासाहेब रेवजी शेळके, उपाध्यक्ष उत्तम भैरू घोरपडे आणि सचिव अण्णासाहेब वाघे यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे.



