आपला जिल्हा

विखे पाटील कारखान्याचा १६ टन प्रतिदिन क्षमतेचा बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्याचा निर्णय कौतुकास्पद- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 विखे पाटील कारखान्याचा १६ टन प्रतिदिन क्षमतेचा बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्याचा निर्णय कौतुकास्पद- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Loni vijay kapse दि १२ नोव्हेंबर २०२६ : सहकारी साखर कारखान्यांना बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारे पाठबळ आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारे आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याने केंद्र सरकारच्या गोवर्धन योजनेअंतर्गत प्रतिदिन १६ टन क्षमतेचा बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, चेअरमन नंदूशेठ राठी, चेअरमन मकरंद गुणे, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह शेतकरी, सभासद व अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

दरम्यान, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाच लाख रुपयांचा धनादेश दुष्काळ सहाय्यता निधीसाठी शासनाकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विखे पाटील कारखान्याने बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्याचा घेतलेला निर्णय धाडसी आणि दूरदृष्टीचा आहे. ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शेतामध्ये वाया जाणाऱ्या कृषी अवशेषांचा उपयोग करून हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतील कचऱ्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.

जाहिरात

बायो-सीबीजी प्रकल्प देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणपूरक विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हरित ऊर्जेच्या निर्मितीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध होण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कारखान्याचे विस्तारीकरण यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. अत्यंत कमी कालावधीत हे काम पूर्ण होणे ही देशातील विक्रमी कामगिरी आहे. नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून गळीत हंगामाची यशस्वी सुरुवात झाल्याचे समाधान व्यक्त करताना, भविष्यात साखर कारखानदारीचे अर्थकारण सक्षम करायचे असेल तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढविण्याला अधिक प्राधान्य द्यावे लागेल, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून देशातील सहकारी साखर कारखान्यांना मोठे पाठबळ मिळत आहे. नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाणार आहे. एक लाख टन उसाचे गाळप पूर्ण करणारा आपला कारखाना राज्यात प्रथम स्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी कारखान्याने गळीत हंगामासाठी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना मिळत असलेली साथ महत्त्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने असली तरी नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून ती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील पिढीच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात होत असलेले हे सकारात्मक बदल निश्चितच यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे