आपला जिल्हा

केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २९ वर्षांनंतर स्नेहमेळावा; दिवाळीत जुन्या आठवणींना उजाळा

 केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २९ वर्षांनंतर स्नेहमेळावा; दिवाळीत जुन्या आठवणींना उजाळा

 शाळेची घंटा पुन्हा वाजताच माजी विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच; ६१ मित्रांचा मैत्रीचा ऋणानुबंध कायम ठेवण्याचा निर्धार

Kopargaon vijay kapse दि १२ नोव्हेंबर २०२६–कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) विद्यालयात सन १९९७-९८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २९ वर्षांनंतर दिवाळीच्या निमित्ताने स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल तीन दशकांच्या उंबरठ्यावर पुन्हा एकत्र आलेल्या ६१ मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत बालपणीच्या मैत्रीचा आनंद पुन्हा अनुभवला. सोमनाथ परजणे व त्यांच्या मित्रपरिवाराने या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

जाहिरात

जीवनात अनेक नाती निर्माण होतात; मात्र शालेय जीवनातील मैत्रीचे नाते हे कायमस्वरूपी असते. शाळेत शिकत असताना एकमेकांना केलेली मदत, अभ्यासातील सहकार्य, शाळेतील गमतीजमती आणि एकत्र घालवलेले क्षण यांची आठवण या मेळाव्यात प्रत्येकाने मनमोकळेपणाने सांगितली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर होते.

जाहिरात

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वावलंबी शिक्षणाचे ब्रीद देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल वैभव आढाव यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक सागर शहा यांनी अडचणीत असलेल्या वर्गमित्रांना मदत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सन १९९७-९८ मध्ये एकाच वर्गात शिकलेले विद्यार्थी २९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याने अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येकाने आपल्या शैक्षणिक प्रवासापासून ते आजपर्यंतच्या जीवनातील वाटचालीचा आणि प्रगतीचा आढावा मनोगतातून मांडला. शहरासह ग्रामीण भागातील मित्र-मैत्रिणींना शिक्षणाने समृद्ध केले असून, मैत्रीचा हा धागा आजही तितक्याच घट्टपणे जोडलेला आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक जाधव सर यांनी केले.

जाहिरात

ज्या शाळेने जीवन जगण्याचे आणि यशस्वी होण्याचे धडे दिले, त्या शाळेच्या प्रांगणात २९ वर्षांनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजली. घंटानाद होताच उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. जुन्या वर्गखोल्या, शाळेचे मैदान आणि शिक्षकांच्या आठवणींनी सर्वजण भावूक झाले.

हिंगणीचे माजी सरपंच किरण दहे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. यावेळी पुढील वर्षीही नव्या उत्साहाने पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प करण्यात आला. विशेष म्हणजे, या माजी विद्यार्थ्यांनी आपल्यातील अडचणीत असलेल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम सुरू ठेवला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शाळा बदलली, काळ बदलला, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र बदलले; मात्र मैत्रीचा बंध आजही तितकाच घट्ट आहे आणि तो कायम राहील, असा विश्वास उपस्थित ६१ माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

शेवटी गणेश थोरात यांनी आभार मानले. सोमनाथ परजणे व ज्ञानेश्वर तेलंगे यांनी सूत्रसंचालन केले. २९ वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात जमलेले हे मित्र म्हणजे केवळ स्नेहमेळावा नव्हता, तर मैत्री, आठवणी आणि सामाजिक बांधिलकीचा अविस्मरणीय सोहळा ठरला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे