अहील्यानगरमध्ये १६ नोव्हेंबरला भाजपचा ‘लोकशाही बचाव, भीडतंत्र हटाव’ मोर्चा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

अहील्यानगरमध्ये १६ नोव्हेंबरला भाजपचा ‘लोकशाही बचाव, भीडतंत्र हटाव’ मोर्चा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
काँग्रेसच्या फेक नॅरेटिव्हला रस्त्यावर उतरून चोख प्रत्युत्तर देणार; मोर्चा राज्यात लक्षवेधी करण्याचे राम शिंदे यांचे आवाहन
Ahilyanagar vijay kapse दि १२ नोव्हेंबर २०२६ : भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहील्यानगर शहरात रविवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘लोकशाही बचाव, भीडतंत्र हटाव’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाकडून देशात जाणीवपूर्वक पसरविण्यात येणाऱ्या फेक नॅरेटिव्हला रस्त्यावर उतरून चोख प्रत्युत्तर दिले जाणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

या मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस सभापती राम शिंदे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, विनायक देशमुख, प्रा. विश्वनाथ कोरडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने काँग्रेसने देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हातात संविधान घेतात; मात्र संविधानाचा आदर करण्याची त्यांची तयारी नाही. कोणत्याही प्रश्नावर संसदेत चर्चा करण्याची त्यांची मानसिकता नाही. संसदेत सत्य बोलावे लागते, त्यामुळे फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून देशात संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

जनतेमध्ये बुद्धिभेद करून तीन निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतरही काँग्रेस नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटत नाही. काही राज्यांमध्ये विजय मिळाला की ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की निवडणूक आयोग व एसआयआरच्या विरोधात आरोप करायचे, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा असल्याची टीका त्यांनी केली.
सीजेपीला पुढे करून काँग्रेस स्वतःची राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप करताना मंत्री विखे पाटील यांनी सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचाही उल्लेख केला. आणीबाणीच्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता याबाबत बोलण्याची आठवण झाली, हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका त्यांनी केली. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे राजकारण सुरू असल्याचेही ते म्हणाले.
सभापती राम शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामकाजाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग बारा वर्षांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही, असे सांगत देशातील जनतेला अभिमान व स्वाभिमान वाटेल असे काम सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्यात आली. संसदेत कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी नसलेल्या विरोधकांच्या रस्त्यावरच्या लढाईला भाजप कार्यकर्त्यांनी तेवढ्याच ताकदीने उत्तर द्यावे. अहील्यानगरचा हा मोर्चा राज्यभरात लक्षवेधी ठरेल, असे नियोजन करण्याचे आवाहनही राम शिंदे यांनी केले.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमनपद मिळाल्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मिळालेले पद हे सर्व नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचे फलित असल्याची भावना डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केली. बैठकीचे प्रास्ताविक भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.



