आपला जिल्हा

दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील २२ नोव्हेंबरला पुन्हा प्रत्येक तालुक्यात दौरा करणार

दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील २२ नोव्हेंबरला पुन्हा प्रत्येक तालुक्यात दौरा करणार

प्रशासनाला दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीची करणार तपासणी; पाणीटंचाई, चारा आणि टँकर नियोजनाला प्राधान्य

Loni vijay kapse दि १४ नोव्हेंबर २०२६ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाला यापूर्वी दिलेल्या उपाययोजनांच्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, याचा आढावा घेण्यासाठी येत्या २२ नोव्हेंबर रोजी पुन्हा प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जाहिरात

प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच विविध गावांतून आलेल्या शिष्टमंडळांशी चर्चा करून गावपातळीवरील प्रश्न समजून घेतले. सार्वजनिक कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जाहिरात

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यापूर्वी प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पाणीपुरवठा योजनांबाबत प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा तालुकानिहाय दौरा करून शेतकरी व ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या मागणीनुसार टँकर उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच पाण्याचे उद्भव असलेल्या ठिकाणी फिल्टर प्लँट उभारण्याच्या कार्यवाहीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन

शेतकऱ्यांची पाण्याची मागणी चुकीची नाही. मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा विचार करून पुढील वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठका झाल्या असून, त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. उपलब्ध पाण्यातून पिण्याच्या पाण्याची गरज भागवून शेतीसाठीही योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असली तरी उपलब्ध पाणीसाठ्यातून आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवर्तनांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता गावपातळीवरील तलाठी आणि ग्रामसेवकांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जाहिरात

अवैध वाळू उपशावर कठोर कारवाईचा इशारा

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी. यापुढे ज्या भागातून अवैध वाळू उपसा होत असेल, त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला. सरकारची प्रतिमा ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर अवलंबून असते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानातून चारा उत्पादनाला प्रोत्साहन

जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यापूर्वी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राने या तंत्रज्ञानावर महत्त्वपूर्ण काम केले आहे. कमी खर्चात आणि कमी पाण्यात चारा उत्पादन घेण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे