नाशिक-पुणे रेल्वेच्या निर्णयासाठी आणखी किती प्रतीक्षा? ६० दिवसांची मुदत संपली, तरी समितीचा अभ्यास सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही
नाशिक-पुणे रेल्वेच्या निर्णयासाठी आणखी किती प्रतीक्षा? ६० दिवसांची मुदत संपली, तरी समितीचा अभ्यास सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही
नाशिक-पुणे रेल्वेच्या निर्णयासाठी आणखी किती प्रतीक्षा? ६० दिवसांची मुदत संपली, तरी समितीचा अभ्यास सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही
Sangmner vijay kapse दि १५ नोव्हेंबर २०२६ : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. प्रकल्पाचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची ६० दिवसांची मुदत संपली असतानाही अभ्यास पूर्ण झालेला नाही. मात्र, समितीच्या सकारात्मक कामकाजामुळे आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याची तयारी आमदार सत्यजीत तांबे यांनी दर्शवली आहे. त्याचवेळी प्रकल्पबाधित शेतकरी, नागरिक आणि रेल्वे समर्थकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जनसुनावणी झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी यापूर्वी झालेल्या आंदोलनादरम्यान समितीला ६० दिवसांपेक्षा अधिक मुदतवाढ देऊ नये आणि प्रकल्पाशी संबंधित नागरिकांसाठी जनसुनावणी घ्यावी, अशा दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.
समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून, दर आठ ते पंधरा दिवसांनी बैठका घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पाचा तांत्रिकदृष्ट्या सखोल अभ्यास करण्यासाठी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससारख्या नामांकित संस्थांचा तज्ज्ञ सल्ला घेण्याचाही विचार सुरू आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर रोजी बैठक झाली. पुढील बैठकही आठ दिवसांत घेण्याचे नियोजन आहे.

समिती प्रकल्पाकडे गांभीर्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असल्याने आणखी काही काळ प्रतीक्षा करण्यास हरकत नसल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले. मात्र, जनसुनावणीच्या मागणीबाबत अद्याप अपेक्षित हालचाल झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
समितीतील सदस्य असलेले पुणे व नाशिकचे विभागीय आयुक्त यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रेल्वे मार्गामुळे जमिनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांची मते तसेच विविध भागांतील सूचना आणि अपेक्षा जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जनसुनावणीसाठी पाठपुरावा करणार
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत सर्व संबंधित घटकांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी जनसुनावणी आयोजित करून बाधित शेतकरी, नागरिक आणि प्रकल्प समर्थकांशी संवाद साधावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे समितीच्या अध्यक्षांसह संबंधित सदस्यांकडे पुन्हा मांडणार आहेत. त्यामुळे आता समितीच्या अंतिम अहवालासोबतच जनसुनावणीच्या निर्णयाकडेही नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाशी संबंधित नागरिकांचे लक्ष लागले आहे.



