अहिल्यानगर बेसबॉल लीगच्या तिसऱ्या पर्वाचे आमदार विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

अहिल्यानगर बेसबॉल लीगच्या तिसऱ्या पर्वाचे आमदार विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते उद्घाटन
महाराष्ट्रातील आठ संघांचे १२० खेळाडू सहभागी; कोपरगावात तीन दिवस रंगणार बेसबॉलचा थरार

Kopargaon vijay kapse दि २४नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन, अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन आणि के. जे. सोमैया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अहिल्यानगर बेसबॉल लीग २०२६ – पर्व तिसरे’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे के. बी. पी. विद्यालय मैदानावर उत्साहात उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील आठ संघांतील १२० खेळाडू सहभागी झाल्याने कोपरगावमध्ये क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज, आमदार विवेकभैय्या कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी संदीपदादा रोहमारे, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, अशोकमामा सरोदे आदी उपस्थित होते.
बेसबॉल हा वेग, चपळता, अचूकता, एकाग्रता आणि संघभावना यांचा संगम असलेला खेळ आहे. अशा राज्यस्तरीय स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागांतील नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. बेसबॉलचा प्रसार होऊन जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, असे प्रतिपादन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव मकरंद को-हाळकर यांनी केले. आभार अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. सुनील कुटे यांनी केले.
२२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचा उद्देश बेसबॉलचा प्रसार, नवोदित खेळाडूंना व्यासपीठ आणि गुणवंत खेळाडूंना पुढील स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हा आहे. उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू कै. किरण मनेरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध प्रायोजक व सहकार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. उद्घाटन सोहळ्यास आयोजक, संघमालक, प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि बेसबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





