भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर; ७ डिसेंबर रोजी कोपरगावात पुरस्कार वितरण सोहळा

भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर; ७ डिसेंबर रोजी कोपरगावात पुरस्कार वितरण सोहळा
दिवाकर कृष्ण आचार्य, अनंता सूर, अशोक सोनवणे, संतोष दौंडे, डॉ. शिवाजी शिंदे व बाबासाहेब सौदागर यांना भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर तर ६३ साहित्यकृतींतून उत्कृष्ट ग्रंथांची निवड
Kopargaon vijay kapse दि २६ नोव्हेंबर २०२६– ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी भि. ग. रोहमारे ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२५ या वर्षासाठी दिवाकर कृष्ण आचार्य, डॉ. अनंता सूर, अशोक सोनवणे, संतोष दौंडे, डॉ. शिवाजी शिंदे आणि बाबासाहेब सौदागर यांच्या साहित्यकृतींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यंदा एकूण ६३ साहित्यकृतींमधून उत्कृष्ट ग्रंथांची निवड करण्यात आली असून, ७ डिसेंबर रोजी कोपरगाव येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे आणि पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी ही माहिती दिली. यावेळी ट्रस्टी रमेशराव रोहमारे, संदीप रोहमारे आणि प्राचार्य डॉ. विजय ठाणगे उपस्थित होते.
ट्रस्टच्या वतीने १९८९ पासून महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह आणि समीक्षा या साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा डॉ. दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या ‘पीळ’ या कादंबरीला ग्रामीण कादंबरीचा पुरस्कार, डॉ. अनंता सूर यांच्या ‘खांदे मळणी’ या कथासंग्रहाला ग्रामीण कथासंग्रहाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ आणि संतोष दौंडे यांच्या ‘निर्जनांचे प्रदेश’ या कवितासंग्रहांना विभागून पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच ‘निवडक स्त्री आत्मकथने : सामाजिक सत्व आणि स्वत्व शोध’ या समीक्षा ग्रंथाला आणि बाबासाहेब सौदागर यांच्या ‘भेद्रपान’ या आत्मकथनाला विभागून पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. या पुरस्कारांसाठी आलेल्या ६३ साहित्यकृतींमधून प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, लक्ष्मण बारहाते, डॉ. जिभाऊ मोरे आणि प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या संयुक्त निवड समितीने पुरस्कारप्राप्त ग्रंथांची निवड केली.

निवड समितीने ‘पीळ’ या कादंबरीतून ग्रामजीवनातील एका वेगळ्या विषयाचे वास्तवदर्शी चित्रण, लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण आणि वैदर्भीय बोलीतील संवादांचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे. ‘खांदे मळणी’ या कथासंग्रहातून जागतिकीकरणाचा ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम आणि बदलती ग्रामीण संस्कृती प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ या कवितासंग्रहातून शेतकरी कुटुंबाचे दुःख, शेती जीवनाची पडझड आणि स्त्रीजीवनाची विविध रूपे व्यक्त झाली आहेत. तर ‘निर्जनांचे प्रदेश’ या संग्रहातून भूमिजनांचे जगणे, मातीशी असलेले नाते आणि हिरवेपणाचा शोध प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. ‘निवडक स्त्री आत्मकथने’ हा ग्रंथ मराठी साहित्य समीक्षेत मोलाची भर घालणारा असल्याचे समितीने नमूद केले. बाबासाहेब सौदागर यांचे ‘भेद्रपान’ हे त्यांच्या ‘पायपोळ’ या आत्मचरित्राचा पुढील भाग असून, त्यातून ग्रामीण जीवनातील भयावह वास्तवाचे दर्शन घडते.
याशिवाय ‘भिरुड’ (योगीराज वाघमारे), ‘धरणीमाय’ (शशिकांत चौधरी), ‘उभ्या रेषेचे वर्तुळ’ (दयाराम पाडलोस्कर), ‘सरत नाही हंगाम एककल्ली’ (गजानन फुसे), ‘शापित कोलाहलाच्या नोंदी’ (अरविंदा भामरे) आणि ‘थिजलेल्या माणुसकीचा गहिवर’ (सोनिया पाटील) या ग्रंथांचा निवड समितीने उल्लेखनीय ग्रंथ म्हणून विशेष निर्देश केला आहे.

कै. के. बी. रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नवोदित लेखकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या पुरस्कार योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी सांगितले. पुरस्कार वितरणाचे हे ३७ वे वर्ष असून, पुरस्कार योजनेचे ३८ वे वर्ष आहे. आजवर महाराष्ट्रातील १८९ पेक्षा अधिक लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. आसाराम लोमटे यांच्या हस्ते आणि चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव येथे होणार आहे. कै. के. बी. रोहमारे यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या पुण्यस्मरण आणि साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड. संजीव कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले आहे.



