नवोदित कवयित्रींच्या कवितांनी रंगले ‘नांदी साहित्य संमेलन’; शेतकरी जीवन, ग्रामीण वास्तव, मैत्री आणि सामाजिक विषयांवरील कवितांनी रसिक मंत्रमुग्ध

नवोदित कवयित्रींच्या कवितांनी रंगले ‘नांदी साहित्य संमेलन’; शेतकरी जीवन, ग्रामीण वास्तव, मैत्री आणि सामाजिक विषयांवरील कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
नवोदित कवयित्रींच्या कवितांनी रंगले ‘नांदी साहित्य संमेलन’; शेतकरी जीवन, ग्रामीण वास्तव, मैत्री आणि सामाजिक विषयांवरील कवितांनी रसिक मंत्रमुग्ध

Kopargaon vijay kapse दि २६ नोव्हेंबर २०२६ पुणे येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिकांना आमंत्रित करण्यासाठी कोपरगाव येथे ‘नांदी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले. कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, कोपरगाव शाखेच्या वतीने आयोजित या एकदिवसीय संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यासपीठावर वात्रटिकाकार विजय वहाडणे, शैलजा रोहोम, प्रा. राजेंद्र साळुंके, प्रा. शिवाजीराव बारगळ आणि प्रा. डॉ. गणेश देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते साहित्यिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
संमेलनातील कविसंमेलन हे विशेष आकर्षण ठरले. शिर्डीचे नवोदित कवी प्रा. गोंदकर यांनी आपल्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. नवोदित कवयित्री अंजली चिखले आणि शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी रेवती चव्हाण यांच्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.

कैलास साळगट आणि दत्तात्रय विरकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडले. प्रमोद येवले यांनी मराठी भाषा संवर्धनाचा संदेश दिला, तर बाळासाहेब देवकर यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे भावविश्व उलगडले. वंदना चिकटे यांनी मैत्रीचे नाते शब्दबद्ध केले. शैलजा रोहोम यांची कविता भावस्पर्शी ठरली. प्रा. सौ. ढमाले यांनी वेगळ्या लयीत सादर केलेल्या कवितेने रसिकांची दाद मिळवली.
छायाचित्रकार कवी हेमचंद्र भवर यांनी राजकारण आणि नोकरीतील संघर्षाचे चित्रण केले. विजय वहाडणे यांच्या खुमासदार चारोळ्यांनी हास्याचे फवारे उडविले, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दादासाहेब गलांडे यांच्या कवितेतून मानवी जीवनातील संघर्षाचे दर्शन घडले.
-
विविध विषयांवरील कवितांच्या सादरीकरणातून ग्रामीण भागातील साहित्यिक मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी मोलाचे योगदान देत असल्याचे अधोरेखित झाले. उत्साहपूर्ण वातावरणात या नांदी साहित्य संमेलनाची सांगता झाली.



