संविधान वाचवण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून संघर्षाची गरज – बाळासाहेब थोरात
संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर
Sangmner vijay kapse दि २६ नोव्हेंबर २०२६ : देशाला मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. या संविधानामध्ये आपल्या साधुसंतांचे विचार, समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाची मूल्ये आहेत. मात्र, आज याच संविधानावर आणि लोकशाही व्यवस्थेवर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाचे रक्षण करण्यासाठी आज काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून संघर्ष उभा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिनानिमित्त ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत ते सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, शोभा बच्छाव, प्रणिती शिंदे, रवींद्र चव्हाण, शिवाजी काळगे, आमदार भाई जगताप, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, रमेश बागवे, प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सुनीता गावंडे, मुजफ्फर हुसेन, चरणसिंग सप्रा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना संविधान रक्षणाची शपथ दिली.
जाहिरात
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, संविधानामध्ये साधुसंतांचे विचार आहेत. समता आणि बंधुतेचा विचार आहे. याच मूल्यांच्या आधारावर देशाची लोकशाही व्यवस्था उभी आहे. मात्र, भाजप सरकारकडून या विचारांवर घाला घालण्याचे आणि संविधान व लोकशाही मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला, त्याग केला. त्यानंतर देशाला संविधान मिळाले. त्यामुळे या स्वातंत्र्याचा आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचा सन्मान राखणे आवश्यक आहे.
जाहिरात
आज देशात मतांची चोरी केली जात आहे, जनतेच्या कौलावर उभे राहिलेले सरकार चोरले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत जनतेचा कौल आणि मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे. हा अधिकारच सुरक्षित राहिला नाही, तर लोकशाहीचा पाया कमकुवत होईल. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी जनतेने जागरूक होऊन संविधानाच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे. संविधान आणि लोकशाही वाचवण्याची जबाबदारी केवळ एका पक्षाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
जाहिरात
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी केंद्र सरकारवर टीका करताना भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्मांना, महिला आणि वंचित समाजाला समान अधिकार दिले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, मोदी-शाह सरकार सर्वसामान्य जनतेचे हे अधिकार काढून घेण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आज धोक्यात आले असून संविधान वाचले तरच देश वाचेल, असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या संविधानविषयक भूमिकेवर टीका केली. संविधाननिर्मितीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर यांनी मनुस्मृतीच्या आधारे संविधान तयार करण्याची भूमिका मांडली होती, असा संदर्भ देत मनुस्मृती आणि ‘बंच ऑफ थॉट्स’ला महत्त्व देणाऱ्या भाजपाला आज संविधानाचा पुळका येणे म्हणजे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ असल्याची टीका त्यांनी केली. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान रद्द करून मनुस्मृती आणायची आहे, असा आरोपही त्यांनी केला.
विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनीही संविधान रक्षणासाठी ठाण्यातून रॅली काढण्यामागची भूमिका स्पष्ट केली. लोकशाहीची हत्या ठाण्यातूनच झाली, याची जाणीव ठेवून संविधान वाचवण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. मतदानात गैरप्रकार होत असून गोकुळमधील सत्ताही भाजपने चोरल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवायचे असतील, तर संविधानाचे रक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.माजी मंत्री नसीम खान यांनीही देशाचे संविधान धोक्यात आले असून भाजप सरकारकडून लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधान रक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाने सर्व जाती, धर्म, भाषा आणि पंथांच्या नागरिकांना समान अधिकार दिले असून या अधिकारांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार भाई जगताप आणि मुजफ्फर हुसेन यांनीही यावेळी आपली भूमिका मांडत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.