पश्चिमेच्या पाण्यावर पहिला हक्क गोदावरी कालव्यांचा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल -आ. आशुतोष काळे
पश्चिमेच्या पाण्यावर पहिला हक्क गोदावरी कालव्यांचा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल -आ. आशुतोष काळे
पश्चिमेच्या पाण्यावर पहिला हक्क गोदावरी कालव्यांचा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल -आ. आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि २३ मार्च २०२४ :- पश्चिम वाहिनी दमण गंगा, वैतरणा, अंबिका, नारपार व उल्हास या नद्यांचे पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे ८० टीएमसी पाणी अती तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना न्यायालयाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र ज्यांच्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राला मिळणारे पाणी कमी झाले आहे. त्यांनीच पश्चिमेच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेवून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका दाखल केली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, अहमदनगर, नासिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, निफाड, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यातील शेतकरी गोदावरी कालव्यांचे लाभधारक आहेत. १०० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून लाभधारक शेतकऱ्यांना गोदावरी कालव्यातून आवर्तन मिळत आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी गोदावरी कालव्याच्या हक्काच्या पाण्याबाबत लाभधारक शेतकऱ्यांना संघटीत करून सातत्याने आवाज उठविला होता. शासनाच्या २००१ च्या अहवालानुसार पश्चिमेला अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील अतीतुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवावे यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी २०१३ साली मा. उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केलेली होती. त्या याचिकेचा दि. २३/९/२०१६ रोजी निर्णय होवून पावसाळ्यात पश्चिमेचे अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी शासनाने मुदतीत कार्यवाही करून पूर्वेकडील खोऱ्यात वळवावे असा आदेश मा. उच्च न्यायालयाने २०१६ ला विद्यमान शासनाला केलेला आहे.
२०१९ च्या हिवाळी अधिवेशनात गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्राला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील अतीतुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्याची मागणी केली होती. तसेच २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करून गोदावरी कालव्याच्या ज्वलंत प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते व नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा हा पाण्यावरून होणारा वाद मिटवावा अशी विनंती केली होती. गोदावरी कालव्यांचे कमी झालेले पाणी पुन्हा मिळविण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना करीत असलेले प्रयत्न व न्यायालयाने शासनाला समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील अती तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी दिलेले निर्देश पाहता याबाबत शासनाला पावले उचलावीच लागणार आहे. मात्र तत्पूर्वीच मराठवाड्याकडून पश्चिमेच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला कायदेशीर विरोध करण्यासाठी माहेगाव देशमुख ग्रामपंचायत व कारखान्याचे सभासद शेतकरी सुनील कारभारी शिंदे यांचे वतीने हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
दारणा-गंगापूर धरणावर सातत्याने बिगर सिंचनाचे आरक्षण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले असून गोदावरी कालव्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी होवून बारमाही क्षेत्रात दोन-तीन आवर्तने मिळणे सुध्दा अवघड होवून बसले आहे.त्यामुळे लाभधारक क्षेत्रातील शेती व शेतकरी यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राला पुन्हा पूर्वीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पाण्याची निर्मिती कशी करता येईल त्याबाबत उपाय योजना व प्रयत्न करणे गरजेचे आहे. लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा फक्त पश्चिमेच्या पाण्यावरच अवलंबून असून त्यावर देखील अधिकार सांगण्याचा प्रयत्न होत असेल तर न्यायालयीन लढाई लढणार -आ. आशुतोष काळे.