फादर फ्रान्सिस द्विब्रिटो – दुर्गा सुधीर तांबे
फादर फ्रान्सिस द्विब्रिटो – दुर्गा सुधीर तांबे
फादर फ्रान्सिस द्विब्रिटो – दुर्गा सुधीर तांबे
संगमनेर प्रतिनिधी दि २५ जुलै २०२४– २५ वर्षापुर्वी रविवार सकाळमध्ये “फादर दिब्रिटों” यांचा दर आठवडयाचा लेख मी आवडीने वाचत असे. अतिशय हुदयस्पर्शी लिखाण असे. तेव्हापासुन मला वाटायचे कि एवढे मोठे फादर मला कधी भेटु शकतील का? माझी मनोमन इच्छा होती कि मला फादर भेटावे. किती त्याग, प्रेम, कष्टातून ते सेवा करतात याचे मला कुतुहुल वाटायचे.
तसे मला माझ्या माहेरच्या रस्त्यावर संगमनेर शहरा नजदीक असणारी “फादरवाडी” माहीत होती. तेथे गरीबांना मिळणारे शिक्षण, अनाथ मुलांचे संगोपन व शिक्षण, परित्यक्ता, एकल महिलांना सबलीकरणासाठी शिवण, नर्सिंग इ. कोर्सेस, आरोग्याची मोफत सेवा अनेक सेवा आजही चालतात. त्या निमित्ताने अनेक वेळेस तेथे वेगवेगळ्या फादरची, सिस्टर यांची भेट व्हायची “फादर दिब्रिटो” भेटावेत अशा मनातील इच्छेनुसार 20 वर्षापूर्वी माझे वडील (ति. भाऊसाहेब दादा थोरात) व डॉ. सुधीर तांबे ज्ञानमाता हायस्कुलमध्ये एक फादरच्या “पुरस्काराच्या” कार्यक्रमाला जाणार होते.
कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता होता. ति. दादांना दुपारी श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. “तांबे हॉस्पिटल” मध्ये त्यांना ऑक्सिजन लावला. डॉ. तांबे मला म्हणाले कि मी दादांजवळ थांबतो तू कार्यक्रमाला जा तेव्हा कार्यक्रमाची वेळ झालेली होती. मी पटकन आवरून गेले तर कार्यक्रम घडयाळाच्या काट्यानुसार सुरु झालेला होता. मला स्टेजवर बोलाविले. मी बघितले कि स्टेजवर थोर विचारवंत श्री रावसाहेब कसबे सर, थोर विचारवंत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड रावसाहेब शिंदे व इतर फादर व तिसरे म्हणजे त्यांना मला भेटायचे होते ते फादर द्रिबिटो. मी पाठीमागे लावलेला फ्लेक्स बोर्ड वाचला तोच सूत्रसंचालन करणाऱ्यांनी माझा सत्कार केला व पुढे ते म्हणाले की आता सौ. दुर्गाताई दोन शब्द बोलतील.
मी तोपर्यंत नगराध्यक्ष नव्हते एवढे मोठे दिग्गज स्टेजवर बघून मी काय बोलणार! एक ज्ञानमातेचे स्वर्गवासी फादर उबर यांच्या नावाने चांगली सेवा करणाऱ्या एका फादरला पुरस्कार होता. मी बोलायला लागले व माझ्या वाचन मंडळात वाचलेले माझ्या आवडीच्या पुस्तकातील गोष्ट अमेरीकेतून भारतात येऊन रुग्ण सेवा करणाऱ्या “डॉ. आयडा स्कडर” ही सांगितली. मी बोलत होते मी बघितले खाली बसलेल्या सर्व सिस्टर, फादर व स्वतः स्टेजवर फादर सुद्धा रडत होते. मी सात ते आठ मिनिट भाषण संपवून खुर्चीवर बसण्यापूर्वीच पुढे येऊन फादर दिब्रिटो उठून माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले काय बोलतेस पोरी तु! तो पर्यंत ते मला ओळखत पण नव्हते. पण त्यांनी माझी ओळख पक्की ठेवली. त्यानंतर श्रीरामपूरलाही मी व फादर एका कार्यक्रमात भेटलो. त्यानंतर पुढे नगरला जातांनी त्यांनी मला एक नारळाचे रोप भेट दिले.
आम्ही एकदा वसईला गेलो तेव्हा खास फादरला भेटायला गेलो. त्यांनी त्यांचे “नाही मी एकला’ “आत्मचरित्र “ भेट दिले ते मी संगमनेरला येईपर्यंत वाचून काढले. ते वाचतांनी आणि मला त्यांचा त्याग, सेवा व कष्ट बघून खूप रडायला यायचे. आत्मचरित्र वाचल्यानंतर फादरला फोन करून सांगितले. आज सकाळीच मला श्री. कानवडे सरांनी फादर गेल्याचा निरोप दिला. वसईचा सत्यजितचा मित्र श्री. कुलदिप वर्तक यांने ही निरोप दिला. खूप वाईट वाटले. पण वयामुळे त्यांना हे जग सोडुन जावे लागले.
हरित वसईच्या संरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, लेखक “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुवार्ताकार फादर द्विब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1942 रोजी वसई तालुक्यातील नंदाखाल गावी झाला होता. त्यांना पुणे विद्यापिठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एमए. पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. 1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरु पदाची दिक्षा घेतली. पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुध्द आवाज उठावणारे कार्यकर्ते, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व असे त्यांची ओळख होती.
अशा महान व्यक्तिमत्त्वाला मी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो अशा शब्दात दुर्गा सुधीर तांबे, अध्यक्ष जयहिंद महिला मंच संगमनेर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.