थोरात कारखान्याची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उपस्थित खेळीमेळीत संपन्न
सत्तेचा गैरवापर करून दहशत करणाऱ्यांचा बंदोबस्त करू – आमदार थोरात; निळवंडे धरण व कालवे कोणी केले जनतेला माहीत
संगमनेर प्रतिनिधी दि १ सप्टेंबर २०२४-अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. ज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही ते आता फोटो काढत आहे मात्र धरण व कालवे कोणी केले हे तालुका जिल्हा व राज्यातील जनतेला माहित आहे. संगमनेर तालुक्याची राजकीय संस्कृती ही चांगली आहे. येथे भेदभाव नाही मात्र या चांगल्या वातावरणात काही मंडळी विष कालवण्याचा प्रयत्न करत असून सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करू असे विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब ओहोळ होते तर व्यासपीठावर मा. आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर,ॲड माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे,रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, व्हा.चेअरमन संतोष हासे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, आर.बी. राहणे, कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे ,इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे,अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ.तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिकराव यादव, सौ.मंदाताई वाघ,श्रीमती मीराबाई वर्पे,रामदास पा. वाघ, संभाजी वाकचौरे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे आपण केले आहे. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत पॅटर्न राबवताना प्रकल्पग्रस्तांना सन्मान दिला. संगमनेर तालुक्यात त्यांना जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या दिल्या. या सर्व कामात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची मदत झाली. याउलट आज जे फोटो काढत आहेत त्यांची कुठलीही मदत नाही. इंचभर जमीन त्यांनी दिली नाही. की एक मुलगा कामाला घेतला नाही.निळवंडे कोणी केले हे सर्वांना माहीत आहे चिंचोली गुरव येथील परिषदेतून दादांनी निळवंडे धरणासाठी पाठपुरावा केला धरण व कालव्यासाठी आपण अविश्रांत काम केले. आज सुदैवाने चांगला पाऊस झाला असून सर्व धरण भरले आहेत. चार रोटेशन होऊ शकतात अशी परिस्थिती आहे .वितरिकांचे काम बाकी आहे ते आपल्यालाच करायचे आहे. निळवंडे च्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देणे हे आपले ध्येय आहे.
जनतेचे सातत्याने प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्यात आणि देशात आपला सन्मान होतो आहे. हे काहींना पहावत नसल्याने ते सातत्याने संगमनेर तालुक्यात विष कालवण्याचा प्रयोग करत आहेत. अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत .54 कार्यकर्त्यांवर खोट्या गुन्ह्यातून खोट्या केसेस दाखल करण्यात आले आहेत .दहशत निर्माण करू पाहत आहेत. मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे त्यांचा बंदोबस्त आपण करू. संगमनेरच्या विकासाबरोबर त्यांची तिथली दहशत कमी करून तिथेही जनतेमध्ये आनंद निर्माण करू .आपण साडेसहा वर्ष महसूल मंत्री राहिलो कधीही कोणाची अडवणूक केली नाही. तालुक्यात विरोधकांच्या संस्था उभ्या राहिल्या त्याच्या मंजुरी आपण दिल्या. सर्वांना बरोबर घेऊन विकास करणे ही आपली संस्कृती आहे हेच काम आपल्याला पुढे चालू ठेवायचे आहे.
निळवंडे मुळे तालुक्याच्या समृद्धीत वाढ होणार आहे याचबरोबर तालुक्यात एकरी उसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त व आदर्श तत्त्वावर कार्यरत असल्याने संपूर्ण राज्यासाठी हा मार्गदर्शक पॅटर्न असल्याचे सांगताना सर्व सभासद ऊस उत्पादक कामगार यांची दिवाळी गोड होणार असल्याचेही ते म्हणाले.
तर बाबा ओहोळ म्हणाले की, कारखान्याने दहा लाख 92 हजार मे टनाचे गाळप केले असून विविध योजनांमधून ऊस उत्पादकांना अनुदान दिले आहे. मागील पाच वर्षात कारखान्याने 243 कोटींची कर्जफेड केली असून राज्यात इतर कारखाने कर्ज घेत आहे. मात्र आपण चांगल्या नेतृत्वामुळे कर्ज फेडतो आहे.आगामी काळात कारखान्यात सौर ऊर्जा प्रकल्प राबवणारे असून सहकारामुळे व चांगल्या नेतृत्वामुळे संगमनेरचा राज्यात डंका निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी इंदिरा महोत्सवा बाबत माहिती दिली.या वार्षिक सभेत बाळासाहेब देशमुख, संग्राम जोंधळे, दौलत गडाख ,विकास सहाने, भास्कर वर्पे, कॉम्रेड तात्याबा बोराडे,रोहिदास डेरे,ज्ञानदेव गडगे,सुधाकर गुंजाळ यांनीही सहभाग घेतला.याप्रसंगी एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर व्हा.चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले. या सभेसाठी सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी,कार्यकर्ते, पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकनिष्ठता मुळे संधी, हा संगमनेर करांचा सन्मानआपण पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांशी कायम एकनिष्ठ राहिलो तत्त्व जपली. सत्तेसाठी कधीही कोलाटउड्या मारल्या नाही. या एकनिष्ठतेची दखल घेऊन देश पातळीवर सर्वोच्च समितीत काम करण्याची संधी मिळणे हा संगमनेरकरांचा सन्मान असल्याचे काँग्रेस नेते आमदार थोरात यांनी म्हटले आहे.