जिल्हास्तरीय शालेय सिलंबम स्पर्धेत रेनबो स्कूलला सुवर्णपदक
जिल्हास्तरीय शालेय सिलंबम स्पर्धेत रेनबो स्कूलला सुवर्णपदक
जिल्हास्तरीय शालेय सिलंबम स्पर्धेत रेनबो स्कूलला सुवर्णपदक
कोपरगाव विजय कापसे दि २ सप्टेंबर २०२४– शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी या शाळेतील, इयत्ता सहावीच्या वर्गातील रिधिमा शंतनू गुळस्कर व अनया गणेश कोळपकर या विद्यार्थिनींनी चौदा वर्ष वयोगटाखालील सिलंबम या भारतीय मार्शल आर्ट प्रकारातील खेळामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले व पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
नुकतेच दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर आणि ऑल अहमदनगर जिल्हा रूरल सिलंबम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल, खिर्डी गणेश, कोपरगाव येथे या स्पर्धा पार पडल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. राजेश्वरी पवार तर ज्ञानेश्वर खुरंगे,ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे अध्यक्ष पी. आय. अत्तार, ऑल इंडिया सिलंबम असोसिएशन अहमदनगरचे अध्यक्ष डॉ. झिया शेख, सचिव डॉ. अमरप्रीत शेख, यांच्या उपस्थितीत सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सिलंबम हा मूळचा तामिळनाडूतील युद्ध कला प्रकार असून त्याचा दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश झाला. या खेळाचे शिवकालीन युद्धकलेशी साधर्म्य असल्याने याविषयी खूप आकर्षण आहे. चौदा, सतरा व एकोणीस वयोगटात हा खेळ खेळला जातो. यात लाठी लढत प्रकारात दहा बाय दहाच्या वर्तुळात दोन प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे राहतात. लाठीच्या सहाय्याने ते एकमेकांच्या शरीराला स्पर्श करून गुण मिळवतात. वर्तुळाबाहेर केल्यास स्पर्धकाचे गुण कमी होतात.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत रेनबो स्कूलच्या विद्यार्थिनींनी विशेष कामगिरी करीत जिल्ह्यात रेनबो स्कूलचे नाव उंचावले आहे. या कामी त्यांना क्रीडाशिक्षक भामरे सर व विकास सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर रिधिमा व अनया या विद्यार्थिनींच्या उज्वल यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल अग्रवाल, कार्यकारी विश्वस्त व सचिव संजय नागरे, विश्वस्त मनोज अग्रवाल, आनंद दगडे, वनिता नागरे, कार्यकारी संचालक आकाश नागरे, शैक्षणिक संचालक नानासाहेब दवंगे, उप प्राचार्य निलेश औताडे आदी पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.