रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी हर्ष गंगवाल याची अमेरिकेला गगनभरारी
रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी हर्ष गंगवाल याची अमेरिकेला गगनभरारी
रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी हर्ष गंगवाल याची अमेरिकेला गगनभरारी
कोपरगाव विजय कापसे दि ७ ऑगस्ट २०२४–शिक्षणमहर्षी स्व.लहानूभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी या शाळेचा सन २०१८ च्या बॅचचा दहावीचा विद्यार्थी हर्ष सचिन गंगवाल, शिर्डी याची अमेरिकेतील नमांकित टेक्सास विद्यापीठात स्थापत्य अभियांत्रिकी व्यवस्थापन (Construction Management) या अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे रेनबोच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गगन भरारी घेतली आहे. याआधीही, मागील महिन्यात रेनबोचा साईश गोंदकर या शिर्डीच्याच विद्यार्थ्याची देखील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात निवड झालेली आहे. हर्ष गंगवाल या विद्यार्थ्याने टोफेल व जीआरई ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. व त्या आधारे त्याची अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात एमएस कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
याचेच औचित्य साधून आज रेनबो शैक्षणिक संकुलात हर्षच्या उज्वल यशाचा कौतुक सोहळा त्याच्या पालकांसह आयोजित केला होता. याप्रसंगी संस्थेचे सचिव संजय नागरे, कार्यकारी संचालक आकाश नागरे, शैक्षणिक संचालक नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य निलेश औताडे, प्रशासकीय प्रमुख रवींद्र साबळे, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या, जिज्ञासु व चौकस वृत्तीच्या हर्षने २०१८ साली दहावीला ९०% गुण मिळवून तर बारावीला सीईटी मध्ये ९४ % परसेंटाईल मिळवत पुण्याच्या पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पदवी पूर्ण केली. हर्ष बद्दल मनोगत व्यक्त करताना शिक्षक दत्ता डोखे व दीपक वक्ते यांनी त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे व शिस्तप्रिय वर्तनाचे अनेक प्रसंग सांगून त्याचे कौतुक केले.
रेनबो स्कूलच्या या भारावलेल्या सत्काराला उत्तर देताना हर्ष गंगवाल याने अतिशय विनम्रपणे रेनबो शैक्षणिक संकुलातील तज्ञ शिक्षकांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, संस्कारक्षम वातावरण, सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम व कडक शिस्त यात तावून सुलाखून निघाल्यानेच मी ही उंच गगन भरारी घेऊ शकलो, हे आवर्जून नमूद केले.
यावेळी, उपस्थित विद्यार्थ्यांना हर्षचे कौतुक सांगताना आकाशजी नागरे म्हणाले की, हर्षच्या रूपाने रेनबो शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संस्थेच्या वतीने लहानूभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून करिअर गायडन्स सेलमार्फत विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन व व्याख्यानांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळते. सत्कार सोहळ्याचा समारोप करताना उपस्थितांचे आभार मानत उपप्राचार्य निलेश औताडे सर म्हणाले की, गंगवाल परिवार एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित परिवार म्हणून पंचक्रोशीत परिचित आहे. शिक्षणाप्रती असलेला त्यांचा ध्यास खरोखर कौतुकास्पद आहे, याचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे.
हर्षच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल अग्रवाल, सचिव संजय नागरे, विश्वस्त मनोज अग्रवाल , आनंद दगडे, वनिताताई नागरे आदी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षक जी. एम. पगारे यांनी केले.