थोरात कारखान्यावर गणेश उत्सवात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
वैभव मांगले व भार्गवी चिरमुले येणार
संगमनेर प्रतिनिधी दि ५ सप्टेंबर २०२४– काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त 7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2024 या काळात अत्यंत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष जगन्नाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेश उत्सव काळामध्ये दरवर्षी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. यावर्षी शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 7 सप्टेंबर रोजी स. 9 वा.श्री गणेशाची मिरवणूक व स्थापना होणार आहे.तर रविवारी सायंकाळी 8 वा. झी टॉकीज गजर कीर्तनाचा या कार्यक्रमातील कीर्तनकार ह.भ.प.ॲड.शंकर महाराज शेवाळे (पुणे) यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. सोमवार 9 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा लोकजागर अशी आमची माय मराठी हा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत रांगोळी व मेहंदी स्पर्धेचे आयोजन केले आहे. तर बुधवारी 11 सप्टेंबर रोजी संगीत खुर्ची व चमचा लिंबू हा महिलांसाठी कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार 12 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. चित्रपट अभिनेते वैभव मांगले,प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले, सुकन्या काळन,निमिष कुलकर्णी, विकास चव्हाण यांच्या अभिनयाने सजलेले मर्डरवाले कुलकर्णी हे सुपरहिट नाटक होणार आहे.
तर शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता सत्यनारायण महापूजा व हळदी कुंकू कार्यक्रम आहे तर 8 वाजता भजनाचा कार्यक्रम आहे.शनिवार 14 सप्टेंबर रोजी शालेय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तर रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. चंदेरी दुनियातील लखलखलता लावण्यांचा कार्यक्रम चंदेरी दुनिया हा होणार आहे. यामध्ये माया खुटेगावकर, प्राची मुंबईकर, संगीता लाखे,अर्चना जावळेकर ,नमिता पाटील या सहभागी होणार आहेत. तर सोमवारी श्रींची मिरवणूक होणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांसाठी अमृतनगर,घुलेवाडी, मालदाड,वेल्हाळे,संगमनेर व पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन अमृत संस्कृत मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.