गौतम पब्लिक स्कूलच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे असंख्य गुणवान विद्यार्थी घडत आहे- माजी विद्यार्थी विजयराव जाधव
गौतम पब्लिक स्कूलच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे
असंख्य गुणवान विद्यार्थी घडत आहे- माजी विद्यार्थी विजयराव जाधव
गौतम पब्लिक स्कूल मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑक्टोबर २०२४:– गौतम पब्लिक स्कूल हे शिक्षण क्षेत्रातील अतिशय विश्वासार्ह नाव आहे. दिवसेंदिवस गौतम पब्लिक स्कूलची शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असून गौतम पब्लिक स्कूलच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे असंख्य गुणवान विद्यार्थी घडत असल्याचे प्रतिपादन गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी विजयराव जाधव यांनी केले आहे. गौतम पब्लिक स्कूल मध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव सौ.चैतालीताई काळे उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना विजयराव जाधव म्हणाले की, गौतम पब्लिक स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, साहित्य, राजकीय आदी क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक कसा करता येईल व येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेच्या माध्यमातून कसे अग्रेसर राहतील यासाठी सुरू ठेवलेल्या प्रयत्नांमुळे गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्यासाठी सन १९७७ ते मार्च २०२४ च्या सर्व बॅचच्या देशाच्या विविध राज्यात वैद्यकीय, संरक्षण, बिझनेस, तंत्रज्ञान, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे गौतमचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गौतम पब्लिक स्कूल विविध सजावटींनी नटले होते. याप्रसंगी गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू सैफ तांबोळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सैफ तांबोळी यांनी इंग्लंडमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तसेच एशियन गेम्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देवून सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.
गौतम पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ मिळत आहे. विविध संकल्पनेतून शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठे होऊन आपल्या पालकांचे, आपल्या गावाचे नाव मोठे करावे या उद्देशाने गौतम पब्लिक स्कूलचे खुप चांगले कार्य सुरु आहे ही अभिमानास्पद गोष्ट असून त्याबद्द्ल आम्हाला सर्वांना समाधान वाटत असल्याचे अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना यावेळी सांगितले. शाळेचे माजी विद्यार्थी असलेले शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. या प्रसंगी गोरक्षनाथ चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक रेखा जाधव यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर निलक, रमेश पटारे, राजेंद्र आढाव, सर्व हाऊस मास्टर्स, शिक्षक वृंद, कार्यालयीन कर्मचारी, मेस विभाग आदींनी काम पाहिले.