आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात राज्य पतसंस्था फेडरेशनची महत्त्वपूर्ण भूमिका – अध्यक्ष काका कोयटे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिखर समितीची बैठक संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि १४ जुलै २०२५– केंद्र सरकारच्या सूचनेवरून आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध सहकारी उपक्रमांच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष मा. काका कोयटे यांनी फेडरेशनच्या उपक्रमांची सविस्तर माहिती सादर केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची सुरुवात होताच शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषद, महाराष्ट्रभर सहकार दिंडीचे आयोजन, तसेच पुढील काही महिन्यांत अहमदपूर येथील सहकार मंत्र्यांच्या गावापासून ते नागपूर (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) या मार्गावर सहकार ध्वज संचलन यात्रा आयोजित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना याबाबत त्यांनी तपशीलवार माहिती दिली.

या सर्व उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी मनापासून स्वागत करत सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची ही सुरुवात असून, राज्यातील सहकारी पतसंस्था आता आंतरराष्ट्रीय सहकार विचारांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री मान.देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली असल्याचे गौरवोद्गार देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. “सहकार खात्याने राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या या कार्यक्रमांसाठी आवश्यक सर्व सहकार्य व पाठबळ द्यावे,” असे स्पष्ट आदेश बैठकीत दिले.







