राज्यघटनेचे पालन होण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी- मा आ.डॉ. तांबे
यशोधन कार्यालयात संविधान दिन साजरा
संगमनेर विजय कापसे दि २६ नोव्हेंबर २०२४– देशाला स्वातंत्र्य मिळाले ही राजकीय क्रांती होती तर राज्यघटना स्वीकारून देशाने सामाजिक क्रांती केली राज्यघटनेमुळे सर्वांना समान अधिकार मिळाले असून मानवता जपणाऱ्या राज्यघटनेचे पालन होण्यासाठी सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे असे आवाहन मा आमदार व जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प्रा. बाबा खरात, रमेश गुंजाळ,अरुण काका गावित्रे, ज्ञानेश्वर राक्षे, बंटी यादव, सोनू गायकवाड, विश्वनाथ आव्हाड, संजय शिंदे ,दीपक जाधव, विजय शेळके, श्रीराम कु-हे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्वांनी संविधान रक्षणाची शपथ घेतली.
याप्रसंगी बोलताना डॉ तांबे म्हणाले की, भारतातील सर्व संतांनी व समाजसुधारकांनी मानवतेचा मंत्र सांगितला आहे आणि हा मानवतेचा मंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये उतरविला आहे सर्व लोक हे समान असून त्यांना समान प्रतिष्ठा देण्याचे काम राज्यघटनेने केले आहे.
राज्यघटना स्वीकारण्यापूर्वी मुठभर लोक सर्व अधिकार वापरत होते मात्र सर्व मानवांना समान अधिकार देण्याचा संतांचा उपदेश स्वीकारून राज्यघटनेने सर्वांना मूलभूत अधिकार दिले.
संविधान हा खऱ्या अर्थाने मानवतेचा ग्रंथ असून तो सर्वांनी जपला पाहिजे. सध्या काही राजकीय पक्ष सामाजिक तेढ निर्माण करून राज्यघटना बदलू पाहत आहेत असे होऊ नये याकरता सर्वांनी कटिबद्ध राहून राज्यघटनेचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले.
अरुण गावित्रे म्हणाले की, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम पुरोगामी विचार जपला असून राज्यघटना व पसायदान या विचारांवर त्यांनी काम केले आहे. मानवतेचा हा विचार सध्या धोक्यात आला असून सर्वांनी मानवतेचा हा मूलमंत्र जपण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन केले.प्रा बाबा खरात यांनी संविधानावरची गीते गायली यावेळी काँग्रेस पक्षासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.