समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे मोठे व्यक्तिमत्व हरपले – माजीमंत्री थोरात
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे मोठे व्यक्तिमत्व हरपले – माजीमंत्री थोरात
आदिवासींचा नेता म्हणून पिचड साहेबांचा कायम लौकिक राहील – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर विजय कापसे दि ६ डिसेंबर २०२४– अकोले सारख्या आदिवासी व दुर्गम भागातून जीवनाचा प्रवास सुरू करणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी राज्यात विविध खात्यांचे मंत्रिपद भूषवताना अत्यंत कार्यक्षमपणे काम केले. राज्यभरातील आदिवासींच्या विकासासाठी मोठे काम करताना अकोले तालुक्याचा सर्वांगीण विकास त्यांनी केला. निळवंडे धरणाच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या या ज्येष्ठ नेतृत्वाच्या निधनाने समाजाच्या विकासासाठी सतत लढणारे मोठे व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अनेक वर्ष मधुकरराव पिचड साहेब आणि आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम केले. आदिवासी गोरगरिबांसाठी अत्यंत तळमळीने त्यांनी राज्यभर विविध योजना राबवल्या. आदिवासी व दुर्गम भागातील त्यांचे संपूर्ण जीवन राहिले. विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून त्यांचे व्यक्तिमत्व घडले. तालुक्याचे सभापती,आमदार,राज्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी अत्यंत समर्थपणे जबाबदारी सांभाळली. आदिवासींसाठी भरीव योगदान दिले आदिवासींचा नेता म्हणून त्यांचा सदैव लौकिक राहील.
याचबरोबर अकोले सारखा दुर्गम मतदार संघ अत्यंत सुंदर पद्धतीने बांधताना पाण्यासाठी मोठे काम त्यांनी केले. शेती फुलवली, अकोले तालुक्यात सहकारी साखर कारखाना निर्माण केला. शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीने सांभाळल्या. जिल्हा बँकेच्या विकासासाठी सातत्याने ताकद देण्याचे काम त्यांनी केले.
दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरणाच्या उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत पॅटर्न राबवल्यानंतर दुष्काळी भागाला पाणी मिळाले. पिढ्यानंपिढ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामामधील त्यांचे योगदान आजरामर राहणार असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देणारे जिल्ह्याचे जेष्ठ नेते व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मधुकररावजी पिचड यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला असून अकोले तालुक्याकरता कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.याचबरोबर संगमनेर तालुका व अमृत उद्योग समूह या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याचे जेष्ठ नेतृत्व हरपले – माजी आमदार डॉ सुधीर तांबे
सहकारातून जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी झाली असून जुन्या पिढीतून नव्या पिढीकडे हा विकासाचा विचार नेण्यात मधुकरराव पिचड यांचे मोलाचे योगदान राहिले. विविध खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे . संघर्षाशील जीवन व पुरोगामी विचार हे पिचड साहेब यांचे वैशिष्ट्य राहिले. असून निळवंडे धरणाच्या उभारणीमध्ये त्यांनी दिलेले योगदान हे पुढील अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे.मधुकरराव पिचड यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले असल्याची भावना माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.
सत्यजीत तांबे –
आमच्या संगमनेर – अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना आमच्या भागाच्या विकासासाठी पिचड साहेबांच्या योगदानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. विशेषतः संगमनेर-अकोले तालुक्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या खांद्याला खांदा लावून दिलेल्या लढ्याला सलाम करतो.