समता इंटरनॅशनल स्कूलचे गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपयुक्त- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
समता इंटरनॅशनल स्कूलचे गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपयुक्त- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
कोपरगाव विजय कापसे दि २४ जानेवारी २०२५ : शिक्षण क्षेत्रात समता इंटरनॅशनल स्कूलची प्रगती उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था असल्याचा नावलौकिक देशात निर्माण केला आहे. समता इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे समताचे विद्यार्थी भविष्यात उज्वल यश संपादन करणार असल्याचा विश्वास अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केला.
समता इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ – २५ ‘अपराजिता’ या संकल्पने अंतर्गत समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनाला अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समताने अपराजिता ही संकल्पना स्नेहसंमेलनासाठी घेऊन समाजात स्त्री जन्माविषयी जनजागृती करत स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा सामाजिक संदेश दिला आहे. तसेच शिक्षणामुळे अबला स्त्री सबला बनून सक्षम स्त्री बनते ती स्त्री खऱ्या अर्थाने अपराजिता होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी केले. त्या म्हणाल्या की, समता इंटरनॅशनल स्कूल १३ वे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करत आहे. वार्षिक स्नेहसंमेलनमधून समताच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्वतःमधील सुप्त कला गुण सादर करण्याची संधी मिळत असते. यामुळे एक परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यात देखील समता अग्रभागी आहे. त्यामुळे पालकांचा समता इंटरनॅशनल स्कूल वरील विश्वास वाढत आहे.
तसेच अपराजिता या संकल्पनेचे दोन पैलू आहेत. एक सक्षम महिला व दुसरा अबला महिला. सक्षम महिलांना नेतृत्व करण्याची संधी शिक्षणातून उपलब्ध करून देणे तर अबला महिलांना सक्षम महिला बनविता येऊ शकते हे अपराजिता या संकल्पनेद्वारा समता इंटरनॅशनल स्कूल ने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जगात विविध क्षेत्रात महिलांनी अपराजिता बनून स्वतःला सिद्ध केले आहे.
समता इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी युनिक आहे. समतातील विद्यार्थी हे उद्याचे सितारे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना गुणांच्या पाठीमागे पळविण्यापेक्षा एक उत्कृष्ट शिक्षणार्थी बनवून यशाच्या पाठीमागे पळविले पाहिजे. देशात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्ताने बदली होत होती. तेव्हा माझ्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सीबीएसई अंतर्गत येणारी अनेक विद्यालये पाहिली पण समता इंटरनॅशनल स्कूल आणि त्यांचा समता पॅटर्न योग्य वाटला. समता पॅटर्न विद्यार्थ्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाणारा असल्याचे शिर्डी विमानतळाचे डेप्युटी कमांडर अमिश कुमार यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सांगितले.
प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ.विनोद चंद्र शर्मा यांनी केले. तसेच तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील विविध परीक्षा व क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन केल्याबद्दल समताच्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार व बक्षीसे देण्यात आली. स्नेहसंमेलनासाठी येणारे विद्यार्थी व पालकांसाठी खाऊ गल्लीचे ही नियोजन करण्यात आले होते.
या वेळी वैजापूर नगरपालिका सीईओ सौ.संगीता सहाणी, राहाता न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीश सौ.आदिती राजवैद्य, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन पी.आय.संदीप कोळी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अरविंद पटेल, गुलशन होडे, चांगदेव शिरोडे, निरव रावलिया, संदीप कोयटे, सौ.सिमरन खुबानी, सौ.श्वेता अजमेरे आदींसह पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्रीरामपूर येथील न्यातीज समता इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य समीर अत्तार यांनी मानले.