ऑस्ट्रेलियन प्रथम श्रेणी महिला क्रिकेटपटूंचा स्थानिक खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात रंगणार क्रिकेटचा थरार

संगमनेर विजय कापसे दि २२ मार्च २०२५—क्रिकेट हा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ असून महिला क्रिकेटची लोकप्रियता ही वाढली आहे. ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणी महिला क्रिकेट संघातील खेळाडू रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी संगमनेर मध्ये येणार असून त्या स्थानिक महिला खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार आहेत याचबरोबर स्थानिक महिलांना प्रशिक्षणही देणार आहेत.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी चषक 2025 निमित्ताने ऑस्ट्रेलियाचा महिला प्रथम श्रेणी क्रिकेट संघ संगमनेर मध्ये येणार आहे.

सहकार महर्षी चषक मागील 25 वर्षापासून या क्रीडा संकुलात होत असून यामध्ये आयपीएल सह आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. तर मागील तीन वर्षापासून एकविरा फाउंडेशन च्या वतीने महिलांच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न झाल्या आहेत.

रविवारी या ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्व महिला खेळाडू क्रिकेट किट मध्ये स्थानिक महिला खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार आहेत . यामध्ये दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ऑस्ट्रेलियाच्या पाच व स्थानिक सहा खेळाडूंचा समावेश राहणार आहे. हा सामना केवळ खेळापुरता मर्यादित न राहता स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संघांसोबत खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी आयोजित केला आहे.
यावेळी प्रदर्शनीय सामन्यानंतर सायंकाळी 5 वा. लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आ डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा सन्मान सत्कार संगमनेरकरांच्या वतीने करण्यात येणार आहे.
तरी हा ऑस्ट्रेलियन प्रथम श्रेणी महिला क्रिकेटपटूंचा सामना पाहण्याकरता संगमनेर मधील सर्व महिला व युवक क्रीडाप्रेमींनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे उपस्थित रहावे असे आवाहन क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे