आ.थोरात यांच्याकडून मेंढवण येथील मृत तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन
शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना – आमदार थोरात

संगमनेर प्रतिनिधी दि १७ जुन २०२४– शाळेच्या पहिल्याच दिवशी मेंढवन शिवारातील शेततळ्यातील पाण्यात तीन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. माजी शिक्षण मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मेंढवन येथे भेट देऊन या तीनही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. याचबरोबर ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना आमदार थोरात यांनी व्यक्त केली.

मेंडवन येथील डापसे,जाधव व बडे कुटुंबीयांच्या भेटी घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी समवेत कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे,बाळासाहेब गायकवाड, शेतकी संघाचे संचालक विनायक काळे, संपत काळे, ज्ञानेश्वर काळे, बढे,आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काल शाळेच्या पहिल्याच दिवशी मेंढवन शिवारात सृष्टी उत्तम दापसे ( इयत्ता सहावी, वय – १३ वर्ष), वैष्णवी अरुण जाधव ( इयत्ता सहावी , वय १२ वर्ष ) आणि अनुष्का सोमनाथ बडे ( इयत्ता चौथी, वय १० वर्ष ) या शालेय विद्यार्थिनी शाळेतून परतून येत असताना गावालगत असलेल्या शेततळ्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली. ही बातमी कळतात मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणेला सूचना देऊन तातडीने सर्वांना मदतीच्या सूचना दिल्या. तर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात यांनीही पदाधिकारी व गावकरी यांच्याशी संवाद साधून तीनही कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
आज मा.शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मेंढवन येथे येऊन डापसे, जाधव व बडे कुटुंबीयांची सांत्वन केले. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शाळेचा पहिला दिवस हा आनंदाचा असतो. या चिमुकल्या विद्यार्थिनी अत्यंत आनंदाने हा पहिला दिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला.ही अकस्मात घटना असून यामुळे सर्वांना मोठे दुःख झाले आहे.शासकीय स्तरावरून या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठीच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेने संपूर्ण तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
