डॉ. मैथिलीताई तांबे यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा कार्यभार; जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार– डॉ. मैथिलीताई तांबे

डॉ. मैथिलीताई तांबे यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा कार्यभार; जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार– डॉ. मैथिलीताई तांबे
भव्य मिरवणुकीने उत्साह पूर्ण वातावरणात पदग्रहण समारंभ संपन्न
संगमनेर विजय कापसे दि ३ जानेवारी २०२५– क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, लालबहादूर शास्त्री, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी सर्व नगरसेवकांनी महाराष्ट्रीयन फेटे बांधले. ढोल ताशांचा गजर आणि भव्य मिरवणुकीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ऐतिहासिक नगरपालिकेच्या प्रांगणात आगमन झाले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनांमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आपला पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी ,जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी, अमर कतारी, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, नगरसेवक सौ.सीमाताई खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौ अर्चना दिघे, सौरभ कासार, सौ शोभाताई पवार ,सौ प्राची काशीद ,किशोर पवार, सौ अनुराधा सातपुते, सौ वनिता गाडे, गजेंद्र अभंग, सौ मालती डाके, नितीन अभंग, सौ दिपाली पांचारीया, गणेश गुंजाळ ,अमजद पठाण, श्रीमती विजया गुंजाळ ,शेख शकीला, शेख नूर मोहम्मद ,सरोजना पगडाल, डॉ दानिश, किशोर टोकसे ,सौ प्रियांका शहा ,शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर मुजीब खान पठाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्य अधिकारी पेखळे, राजेंद्र गुंजाळ यांच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वच्छता, बंधुभाव, एकात्मता ही आपली संस्कृती आहे. आपण कुणाचाही द्वेष करत नाही. राज्यात सर्वाधिक मोठा विजय मिळाला असून या विजयाचे श्रेय संगमनेर मधील सर्व जनतेला आहे. 1991 पासून नगरपालिकेला आदर्श परंपरा सुरू झाली असून यामध्ये डॉ. सुधीर तांबे यांच्यापासून तर सौ दुर्गाताई तांबे यांच्यापर्यंत सर्व नगराध्यक्ष उपनगराअध्यक्ष व नगरसेवकांनी चांगले काम केले .नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या या पुढील काळातही नवीन काय करता येईल ते चांगले करा .आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे करतो. आत्मविश्वासाने करतो.संगमनेर शहरातील जनता, आनंदी सुखी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर शहर देशात आदर्श बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत यामध्ये नागरिकांचा सहभाग सुद्धा महत्त्वाचा आहे. सेवा समितीच्या जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा असून पहिल्या शंभर दिवसांचे काम सुरू केले आहे. गणेश नगर व दिल्ली नाका परिसरामध्ये नगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय उभे केले जाणार असून दरवर्षी नगरसेवकांचा कार्य अहवाल नागरिकांना दिला जाणार आहे याचबरोबर नगरपालिकेत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी अन्यथा कारवाई करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.
राजेश मालपाणी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहराला सुसंस्कृत परंपरा आहे हे चांगले काम डॉ मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वात पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सरोजना पगडाल, प्राची शहा जर्मनीच्या खासदार क्लोडिया नॉलटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले सूत्रसंचालन सुविधा अरासिद्ध व शोभा हजारे यांनी केले तर प्रमिला अभंग यांनी आभार मानले. यावेळी शहरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार –नगराध्यक्ष डॉ. सौ तांबे
लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील नागरिकांना चांगल्या व उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी सेवा समितीची टीम काम करणार असून 2.0 ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा शब्द देताना संगमनेरच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असा विश्वास डॉ. मैथिलीताई तांबे यांनी व्यक्त केला.
जन्ममृत्यूचे दाखले घरपोच मिळणार
शहरातील नागरिकांना जन्माचा व मृत्यूचा दाखला हा घरपोच दिला जाईल असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले असून शास्तीकर माफीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे या योजनेचा शहरातील नागरिकांनी तातडीने लाभ घ्यावा असे आवाहन करताना विविध नागरिकांच्या घरावरील असलेले आरक्षण हटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होईल असेही आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.



