खेळातुन मिळते हार जीत पचवण्याची ताकद- नितिनदादा कोल्हे

खेळातुन मिळते हार जीत पचवण्याची ताकद- नितिनदादा कोल्हे
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न

कोपरगांव विजय कापसे दि १४ जानेवारी २०२६: खेळ म्हणजे केवळ शारीरिक ताकद, विजय पराजय किंवा स्पर्धा इतकाच मर्यादित विषय नसून, तो मानवी मूल्ये, संघभावना, संयम आणि हार जीत समतोलपणे स्वीकारण्याची ताकद देणारी जीवनशाळा आहे. खेळातून परस्पर प्रेम, आदर, सहकार्य, शिस्त आणि एकात्मतेची भावना निर्माण होते. बहुतांशी खेळ संघाने खेळले जात असल्याने प्रत्येक खेळाडूची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे ‘मी’ पेक्षा ‘आपण’ ही भावना दृढ होते. यश मिळाल्यास सर्वांचा आनंद आणि अपयश आल्यास सर्वांची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता निर्माण होते. हार जीत पचवण्याची ताकद ही खेळातुनच मिळते, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी केले.

संजीवनी सैनिकी स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी श्री नितिनदादा कोल्हे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विश्वस्त सुमित कोल्हे, डायरेक्टर (नॉन अॅकॅडेमिक) डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर व कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर उपस्थित होते. प्रारंभी सांगळे यांनी सर्वांचे स्वागत करून अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी संस्था शैक्षणिक, क्रीडा व सैनिकी प्रशिक्षण या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर कामगिरी करीत असल्याचे नमूद केले.

नितिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की सैनिकी शालेय शिक्षणात शारीरिक कसरती, कवायती, शिस्तबद्ध दिनक्रम आणि खेळ यांचा समन्वय साधला जातो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती बरोबरच मानसिक कणखरपणा, नेतृत्वगुण, संघभावना आणि देशभक्तीची भावना विकसित होते. क्रीडा स्पर्धांमधील नियोजन, संचलन, वेळेचे पालन आणि नियमबद्ध खेळ हीच मूल्ये सैनिकी शिक्षणातही केंद्रस्थानी असतात. त्यामुळे खेळ आणि सैनिकी शिक्षण एकमेकांना पूरक ठरून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्यात मोलाची भूमिका बजावतात, हे संजीवनीच्या कार्यातून सातत्याने दिसून येते.

या महोत्सवात संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बँड संघाच्या उल्लेखनीय कामगिरीचा विशेष गौरव करण्यात आला. हा ब्रास बँड संघ सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य पातळीवर विजेता ठरला असून, यावर्षी विभागीय स्पर्धेतही विजय मिळवत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सात राज्यांच्या पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत संजीवनीचा संघ पश्चिम विभागाचे नेतृत्व करणार असल्याने ही संस्था क्रीडा, सांस्कृतिक व सैनिकी शिस्त यांचा उत्तम समन्वय साधणारी अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
यावेळी २९ कलाकारांच्या ब्रास बँड पथकाने विविध देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या पथकाचे मार्गदर्शक संगीत शिक्षक महेश गुरव यांचा गौरवही करण्यात आला. ब्रास व ताल वर्गवारीतील एकूण २९ अद्ययावत वाद्यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, तालबद्धता आणि सांघिक सुसूत्रता यांचे उत्तम प्रशिक्षण दिले जात असल्याचे सुमित कोल्हे यांनी सांगितले.



