आ.आशुतोष काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात गौण खनिज माफियांवर कारवाई करण्याची केली मागणी

आ.आशुतोष काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात गौण खनिज माफियांवर कारवाई करण्याची केली मागणी
आ.आशुतोष काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात गौण खनिज माफियांवर कारवाई करण्याची केली मागणी

कोपरगाव विजय कापसे दि १३ मार्च २०२६–कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवैध गौण खनिजाचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यामुळे मतदारसंघातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून माती, वाळू आणि मुरूमाची अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आ.आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेदरम्यान या ज्वलंत मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

आ.आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील अवैधपणे गौण खनिजाच्या होत असलेल्या उपशाकडे सभागुहाचे लक्ष वेधतांना सांगितले की, कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असून ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनीचे उत्खनन सुरू आहे. हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही तर यातून मिळणाऱ्या अवैध पैशांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना वावर वाढत आहे. या पैशांच्या बळावर हे माफिया दहशत निर्माण करीत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाळू उपसा थांबवण्यात यावा यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित कार्यालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाला वाळू उपसा बंद करण्यात अपयश येवून महसूल आणि पोलीस प्रशासनाला न जुमानता गौण खनिजाचा उपसा सुरूच आहे.

गौण खनिज सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाची असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. केवळ महसूल विभाग या माफियांचा बीमोड करू शकत नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा कारवाई करतांना पोलिसांची मदत लागते. यामुळे महसूल विभागाला पोलीस प्रशासनाच्या भक्कम पाठबळाची गरज आहे.

जर पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवली तर ही कारवाई अधिक गतीने आणि प्रभावीपणे होऊ शकेल. जोपर्यंत पोलीस बळ या कारवाईत पूर्ण ताकदीने उतरत नाही तोपर्यंत अवैध गौण खनिज उपसा कायमस्वरूपी थांबणार नाही. त्यामुळे गृह विभाग आणि महसूल विभागाने समन्वयाने काम करून अवैध अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांना कायमचा लगाम घालावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळात केली आहे.



