कोपरगावात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा सायकल रॅली; विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहरात निर्माण झाले देशभक्तीचे वातावरण

कोपरगावात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा सायकल रॅली; विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहरात निर्माण झाले देशभक्तीचे वातावरण
कोपरगावात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा सायकल रॅली; विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहरात निर्माण झाले देशभक्तीचे वातावरण
Kopargaon vijay kapse दि १४ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाप्रती आदराची भावना दृढ करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या वतीने ‘हर घर तिरंगा अभियान २०२६’ अंतर्गत गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

विद्यालयाच्या प्रांगणातून तिरंगा ध्वज फडकावून व देशभक्तीपर घोषणांच्या गजरात रॅलीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सायकलींवर तिरंगा ध्वज घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हर घर तिरंगा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रॅली विद्यालयाच्या प्रांगणातून नगरपरिषद कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत काढण्यात आली. मार्गावरील विविध ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

‘हर घर तिरंगा’चा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान व आदराची भावना निर्माण करणे तसेच स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय उत्सव उत्साहात साजरा करण्याबाबत जनजागृती करणे, हा रॅलीचा प्रमुख उद्देश होता.
रॅलीस कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी संधान व मुख्याधिकारी अजित निकत यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव जी. के., पर्यवेक्षक दाणे आर. व्ही., एन.सी.सी. विभागप्रमुख जाधव बी. आर., आर.एस.पी. विभागप्रमुख आरोटे एस. बी., सांस्कृतिक विभागप्रमुख चव्हाण एस. एस. यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे आणि उत्स्फूर्त घोषणांमुळे रॅलीला विशेष भव्यता प्राप्त झाली. तिरंगा हातात घेऊन सायकलवरून मार्गक्रमण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘देश प्रथम’ या भावनेचा जागर केला.
‘हर घर तिरंगा—घराघरात तिरंगा, मनामनात देशभक्ती!’ या संदेशातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याच्या सन्मानाचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.




