आमदार लंके यांची राज्यभर सामान्य जनतेसाठी झटणारा पळणारा कार्यकर्ता म्हणून ओळख- आ बाळासाहेब थोरात
निलेश लंके यांनी घेतली काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांची भेट
संगमनेर विजय कापसे दि ३१ मार्च २०२४– नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पारनेर तालुक्याचे युवा आमदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी आ.निलेश लंके यांनी शनिवारी रात्री आमदार थोरात यांची भेट घेतली. यावेळी समवेत कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात व पारनेरचे राहुल झावरे हे होते. यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सुसंस्कारित राजकारण केले आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. राजकारणामध्ये ज्या नेत्यांबद्दल सर्वांना आदर आणि आत्मीयता आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय बाळासाहेब थोरात आहेत.
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधानमंडळात कामकाज करताना त्यांनी सातत्याने मदत केली. सातत्याने विधानसभेत नवीन आमदारांना मदत व मार्गदर्शन करणारे आमदार बाळासाहेब थोरात हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद हा राजकारणात आणि समाजकारणात नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आज त्यांच्या भेटीसाठी आलो असल्याचे आ.निलेश लंके यांनी सांगितले.
तर आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, आ.निलेश लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे.सामान्य जनतेसाठी झटणारा पळणारा कार्यकर्ता अशी त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम सातत्याने करणारे नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे मोठे नाते आहे. नगर दक्षिण मध्ये समोरचे उमेदवार मोठे आहे मात्र हा लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे. ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई होणार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमदार निलेश लंके यांचे मोठे यश राहणार आहे.
हे यश महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचे राहणार असल्याचेही आमदार थोरात यांनी सांगताना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे नक्कीच विजय होतील अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या आहेत.