आ.थोरात यांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी तरुणाची रुग्णालयात घेतली भेट
निवडणुकीच्या धामधुमीतही सर्वसामान्यांप्रती आपुलकी कायम
संगमनेर प्रतिनिधी दि १ मे २०२४– जांबुत खुर्द येथील शिवाजी बबन पारधी हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात रविवारी गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला तातडीने संगमनेर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अत्यंत व्यस्त दिनक्रम व निवडणुकीची धामधूम असतानाही सर्वसामान्यप्रति कायम आपुलकी व जिव्हाळा असलेले लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने दवाखान्यात जाऊन या तरुणाची भेट घेऊन मदतीच्या सर्व सूचना दिल्या.
जांबुत खुर्द गावातील वाडा वस्ती येथील शिवाजी पारधी हा तरुण शेतकरी आपल्या शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. यामध्ये त्याच्या उजव्या खांद्याला, छाती, पोट आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. यावेळी गावातील नागरिकांनी तातडीने त्यांना औषध उपचारासाठी संगमनेर येथील कुटे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले.
तेथे उपचार सुरू असताना अत्यंत दिनक्रम व्यस्त असतानाही आणि निवडणुकीची धामधुम असतानाही ही बातमी कळताच काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन या तरुणाची भेट घेत चौकशी केली. यावेळी समवेत सभापती शंकर पा खेमनर सौ मीराताई शेटे उपसरपंच सुभाष डोंगरे व पदाधिकारी होते.
याप्रसंगी या तरुणाला मदतीच्या सर्व सूचना काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी यानंतर पुढील उपचारासाठी शिवाजी पारधी या तरुणाला एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आले आहे. अत्यंत व्यस्त दिनक्रम असतानाही लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात ही जनतेच्या मदतीसाठी कायम धावून येत असून त्यांच्याप्रती पारधी कुटुंबीय व जांबुत ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त करून आमदार बाळासाहेब थोरात व कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांना धन्यवाद दिले आहेत.