एकविराच्या वतीने बचतगटाच्या २०० महिलांना घरगुती पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण; गृह उद्योजकतेसाठी एकविराचे महिलांच्या पंखांना बळ
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून घरगुती पदार्थ निर्मिती व व्यवसायासाठी प्रोत्साहन
संगमनेर प्रतिनिधी दि १६ जुन २०२४– काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अध्यक्षा व कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सातत्याने महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले असून संगमनेर तालुक्यात असलेल्या बचत गटांमधील महिलांना गृह उद्योगाचे प्रशिक्षण ,त्याचे ब्रँडिंग आणि विक्रीसाठी मार्केटिंग सह विविध सुविधा निर्माण करून दिल्या असून यामुळे तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना उद्योजकतेचे बळ मिळाले आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी बिस्किट व केक बनवण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी सुवर्णा राऊत यांनी उपस्थित महिलांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. याप्रसंगी प्रशिक्षणासाठी 204 महिला उपस्थित होत्या. यावेळी बिस्किटे व विविध केक बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.
एकविरा फाउंडेशनच्या वतीने यशोधन कार्यालयात दर महिन्याच्या शनिवारी बचत गटाच्या महिलांकरता विविध गृह उद्योगासह पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. चकली,अनारसे, मासवड्यांचा विविध खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण दिले आहे.याचबरोबर डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून तालुक्यातील सर्व महिला बचत गटांच्या उत्पादित मालाचे ब्रॅण्डिंग करण्याकरता प्रोफेशनल फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग केले आहे. या माध्यमातून त्या बचत गटांना सोशल मीडिया मधून आपल्या उत्पादित मालाचा प्रचार करता येणार आहे.
यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बचत गटांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे.यामधील महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. तसेच नव्याने घरगुती पदार्थ बनवणे व त्याचे मार्केटिंग करणे.यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यामधून महिलांना स्वयंरोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
मेट्रो व मोठ्या शहरांमधून घरगुती पदार्थांना मोठी मागणी असून आकर्षक पद्धतीने पॅकिंग व ब्रँडिंग करून या महिलांनी उत्पादित केलेली घरगुती पदार्थ विकले जाणार आहेत. यामुळे त्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदत होणार आहे.ग्रामीण भागातील महिला अधिकारी सक्षम करण्याबरोबर त्यांचे आरोग्य चांगले राहील.यासाठी एकविराच्या माध्यमातून सातत्याने काम सुरू असून महिलांकरता राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यशाळेसाठी विविध महिला पदाधिकारी व एकविरा फाउंडेशनच्या सदस्या आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.